मलपीपेक्षाही मिरकरवाडा बंदर सुसज्ज होणार : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मिरकरवाडा बंदर विकासासाठी मोठे पाऊल उचलले आहे. मलपीपेक्षाही मोठे सुसज्ज व अत्याधुनिक बंदर उभे राहणार आहे. यामध्ये आकसापोटी कोणतीही कारवाई होत नसल्याचे राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटीवरील सुमारे तिनशेहून अधिक अतिक्रमणे हटवण्याची नोटीस मत्स्य विभागाने काढली आहे. त्यामुळे महिला मच्छीमारांमध्ये संतप्त भाव उमटत आहेत. गुरुवारी महिला मच्छीमारांनी मत्स्य विभागाच्या कार्यालयावर धडक दिली होती. शुक्रवारी जिल्ह्याचे पालकमंत्री रत्नागिरी दौऱ्यावर आले असता, त्यांची विश्रामगृहावर मच्छीमार बांधव व महिलांनी भेट घेतली व कारवाईबाबत चर्चा केली. यावेळी पालकमंत्र्यांनी या मच्छीमारांना बंदराच्या विकासाबाबत समजावून सांगितले. आपल्याच कालावधीत जवळपास वीस ते पंचवीस वेळा कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर प्रत्यकवेळी अतिक्रमणे उभारली गेली. मात्र, मच्छीमारांनाच फायदा व्हावा, बंदराचा विकास व्हावा, यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी धोरणे आखली आहेत. यात कोणताही आकस ठेवून कारवाई केली जात नाही. आपणही त्यावेळी बैठकीला उपस्थित होतो. त्यामुळे मच्छीमारांनी आपली बांधकामे काढून घ्यावीत, मत्स्य विभाग तातडीने कारवाई करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे मत्स्य बंदर असल्याने मलपीपेक्षाही मोठे आणि सुसज्ज बंदर उभारले जाणार आहे. जवळपास पाचशे कोटींचा आराखडा तयार केला जात असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 25/Jan/2025