रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्गावरील नाणिज गाव बसथांबा येथे भुयारी मार्ग मिळावा यासाठी ग्रामस्थ रास्ता रोकोवर ठाम असून, प्रजासत्ताक दिनी महामार्ग रोखण्याचा निर्धार केला आहे. नाणिज येथील जि.प. प्राथमिक शाळा १ जवळ हे आंदोलन होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
नाणिज बाजारपेठ ही लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्याचा केंद्रबिंदू आहे. नाणिज पंचक्रोशीतील गावाचा हा बसथांबा ७० वर्ष जुना आहे.
याठिकाणी महामार्गाचा भराव टाकला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जनावरे व अवजारे घेऊन जाण्यासाठीही जवळपास ८०० मीटरचा वळसा मारावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर शेती सोडून देण्याची वेळ शासन आणणार आहे का असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
याच बसथांब्याजवळ ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस, तलाठी कार्यालय, पंचक्रोशी सोसायटी, बँका, दवाखाना, मेडीकल, किराणा व भाजी दुकाने असल्यामुळे आता ग्रामस्थांना मोठा त्रास होत आहे. छोट्या मुलांसाठीची जि.प. शाळाही जवळ असल्यामुळे मुलांनाही मोठा धोका आहे.
त्यामुळे नाणिज बसथांब्याजवळ भुयारी मार्ग काढावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून, या मार्गासाठी प्रजासत्ताक दिनी रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 25/Jan/2025














