ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय
एसटी प्रवासात NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST Bus) विविध सवलतींचा लाभ घेणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप हे स्मार्ट कार्ड प्राप्त झालेले नाही. त्यामुळे केवळ तांत्रिक कारणास्तव पात्र लाभार्थी सवलतींपासून वंचित राहू नयेत, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
१ ऑगस्टची मुदत आता १ सप्टेंबरवर
राज्य शासनाच्या वतीने ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजने’अंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास, तर सामान्य ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली जाते. या सवलती अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी १ ऑगस्टपासून NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र, अनेक प्रवाशांनी नोंदणी करूनही कार्ड मिळण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंत्री सरनाईक यांनी या अंमलबजावणीला एका महिन्याची मुदतवाढ जाहीर केली.
डेपोंमध्ये गर्दी आणि तक्रारींची दखल
सध्या राज्यभरातील विविध एसटी बस डेपो आणि शहरांमधील केंद्रांवर स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. याशिवाय काही ठिकाणी हे कार्ड जादा दराने विकले जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी हेळसांड आणि गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने १ सप्टेंबरपर्यंतची सवलत दिली आहे.
एसटी प्रवासात NCMC स्मार्ट कार्ड लवकरात लवकर काढण्याचे आवाहन
या निर्णयामुळे कार्ड न मिळालेल्या हजारो अमृत ज्येष्ठ नागरिक, इतर ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. “तांत्रिक कारणांमुळे एकाही पात्र प्रवाशाची गैरसोय होऊ नये ही सरकारची भूमिका आहे,” असे स्पष्ट करत, वाढीव मुदतीचा वापर करून सर्व पात्र प्रवाशांनी आपली एनसीएमसी स्मार्ट कार्डची नोंदणी प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:24 29-07-2026














