रत्नागिरी जिल्ह्यातील ६०४ पाणीपुरवठा योजनांचे काम पूर्ण; १०० कोटींची बिले प्रलंबित असल्याने ठेकेदार हवालदिल
जलजीवन मिशन रत्नागिरी अंतर्गत जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांच्या कामांना निधीअभावी मोठा ब्रेक लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर असलेल्या एकूण १ हजार ४२८ कामांपैकी ६०४ कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ३८४ पूर्ण झालेली कामे प्रत्यक्षात संबंधित ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. पाणीपुरवठा योजनांच्या कामांवर मंजूर १ हजार १६७ कोटी ७३ लाख रुपयांपैकी आतापर्यंत ६०९ कोटी ६७ लाख रुपये खर्च करण्यात आले असून, उर्वरित कामांना निधीअभावी खीळ बसली आहे.
योजना अन् कामांचा टप्पा
जिल्ह्यासह राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना नळाद्वारे घरोघरी शुद्ध आणि पुरेसे पाणी मिळावे, या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ‘जलजीवन मिशन’ सुरू करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला नळजोडणी देऊन शाश्वत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन होते. पहिल्या टप्प्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला; मात्र, पुढे निधीच्या तुटवड्यामुळे कामांचा वेग मंदावला. निधी वेळेत न मिळाल्याने काही ठिकाणी कामे पूर्ण होऊनही टँकरने पाणीपुरवठा करावा लागल्याचे चित्र निर्माण झाले.
जलजीवन मिशन रत्नागिरी अंतर्गत तालुकानिहाय पूर्ण झालेली कामे
जिल्ह्यात ६०४ योजनांची कामे पूर्ण झाली असून एकूण ४२.२३ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तालुकानिहाय पूर्ण झालेल्या कामांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे:
| तालुका | पूर्ण झालेली कामे |
|---|---|
| मंडणगड | ६५ |
| दापोली | ६८ |
| खेड | ६२ |
| गुहागर | ३० |
| चिपळूण | ५० |
| संगमेश्वर | ८१ |
| लांजा | ८० |
| रत्नागिरी | ८१ |
| राजापूर | ८७ |
| एकूण | ६०४ |
५८४ गावे ‘हर घर जल’ घोषित; ठेकेदारांची १०० कोटींची बिले प्रलंबित
जिल्ह्यातील ५८४ गावांमध्ये नळजोडणीची कामे पूर्ण झाली असून ही गावे ‘हर घर जल’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. उर्वरित ८४४ गावे घोषित होणे बाकी आहे. जिल्ह्यातील ४ लाख ४८ हजार १६१ कुटुंबांपैकी ३ लाख ८८ हजार ४२९ कुटुंबांना घरगुती नळजोडणी देण्यात आली आहे. दरम्यान, ठेकेदारांनी स्वतःचे पैसे वापरून कामे पूर्ण केली असली, तरी त्यांची तब्बल १०० कोटी रुपयांची बिले अद्याप देण्यात आलेली नाहीत. शासनाकडून अनुदान न आल्याने जिल्हा परिषदेकडून ठेकेदारांची रक्कमेची देयके थकली असून ठेकेदार जिल्हा परिषदेत चक्रा मारत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:57 29-07-2026













