रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शनिवारी मध्यरात्रीपासून भाडेवाढ केल्यामुळे रत्नागिरीतून मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूरसह सर्वच ठिकाणाचा प्रवास महागला आहे. रत्नागिरीतून मुंबईचा प्रवास साध्या बसने ७९ रुपये व शिवशाहीने ११८ रुपये वाढला आहे. रत्नागिरीतून पुण्याला जायचे असेल तर कोल्हापूरमार्गे साध्या गाडीने ८४ रुपये वाढला आहे. शिवशाहीने जायचे झाल्यास हाच दर ११८ रुपये द्यावा लागणार आहे. रत्नागिरी तालुक्याजवळील ठिकाणी जाण्यासाठीही किमान १५ रुपयांच्यावर तिकीट दरवाढ झाली आहे. सर्वच तिकिटात भरघोस वाढ झाल्यामुळे अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महामंडळाने प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री लावली आहे. दरवाढ लागू झाल्याने महामंडळाची तिजोरीत मोठी भर पडणार आहे. गेल्या तीन वर्षांत प्रवाशांना दिलेल्या भरघोस सवलतीमुळे प्रवासी ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे राज्य परिवहन महामंडळ आता फायद्यात येऊ लागले आहे. तसेच सीएनजी बस आणि इलेक्ट्रिक बसमुळे रा. प. महामंडळ फायद्यात राहील, असा अंदाज आहे. नवे सहकार स्थापन होताच नागरिकांना दरवाढीचे चटके बसू लागले आहेत. एसटीच्या तिकीट दरात १४.९५ टक्के वाढ करण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली होती. ही दरवाढ मध्यरात्रीपासूनच लागू झाली. त्यामुळे आता सामान्य प्रवाशांना जादा दराने तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे.
एसटीचा प्रवास महागला आहे. यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशात हात घालून महामंडळाने जास्तच पैसे काढले आहेत. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात भाडेवाढ करू नये. – दिवाकर पाटील. (प्रवासी)
एसटीचा प्रवास खूपच महागल्यामुळे सामान्य प्रवाशांना प्रवास करताना अडचण निर्माण होणार आहे. मुंबई, पुण्याला जाण्याकरिता अनेकजण एसटीला प्राधान्य देतात, परंतु आता तिकीट दर वाढल्यामुळे प्रवासी रेल्वेकडे वळतील. – संदीप भोसले (प्रवासी)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 27/Jan/2025













