सांगली : विरोधक माझ्या हेलिकॉप्टर दौऱ्यावर टीका करतात, मग मी काय कारने प्रवास करू का? आठ तासांत मी 10 हजार फाईलींवर सह्या करतो, लाडक्या बहिणींना मी लखपती केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
अनिल बाबर यांचं नाव न देता टेंभू योजना पूर्ण होऊ शकत नाही असं सांगत टेंभू योजनेला अनिलभाऊ बाबर यांचं नाव देऊ असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं. सांगलीतील शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले की, अनिल बाबर यांचे नाव घेतल्याशिवाय या सभेला सुरुवात होऊ शकत नाही. अनिल बाबर यांच्याशिवाय टेंभू योजनेचे भूमिपूजन करावे लागेल असे वाटत नव्हते. अनिल बाबर यांचे टेंभू योजनेतील योगदान कुणालाही विसरता येणार नाही. दोन वर्षांपूर्वी सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आणण्याचा आम्ही निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या आणि शिवसेनेचे हितासाठी आम्ही निर्णय घेतला. एक नाहीतर 50 आमदार माझ्या पाठीमागे उभे राहिले. आमच्या बंडाची 32 देशांनी दखल घेतली. आमच्या बंडानंतर सरकार देखील स्थापन झालं. अनिलभाऊ बाबर यांच्या निधनानंतर ‘गड आला पण सिंह गेला’ अशी परिस्थिती झाली होती.
लाडकी बहिण योजना बंद होणार नाही
एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आम्ही ही योजना आखली नाही. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे हा हेतू आहे. योजनांच्या बाबतीत सरकार हात आखडता घेणार नाही. वीज बिल पूर्ण माफ करण्याचा देखील सरकारने निर्णय घेतला आहे.
माझ्यावर 50 आमदार आणि 13 खासदारांनी विश्वास ठेवला असं सांगत एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनिकांच्या विचारांशी तडजोड होऊ लागली तेव्हा मी सत्तेतून पायउतार झालो. सर्वसामान्यांचे सरकार या राज्यात काम करतेय. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या आणि पैशात लोळणार्या लोकांनीच मुख्यमंत्री झालं पाहिजे असं काही आहे का? सरकार स्थापन झाल्यापासून आज पडेल उद्या पडेल असे वेगवेगळी भाकीतं केली पण अजून सरकार पडले नाही. महाराष्ट्रातील जनतेने यांचे सर्व मनसुबे धुळीस मिळवले.
सावत्र भावापासून सावध राहा
एकनाथ शिंदे म्हणाले की, माझ्या हेलिकॉप्टर दौऱ्यावर टीका होते, मी काय कारने प्रवास करू का? आठ तासात मी दहा हजार फाईलीवर सह्या करतो. लाडकी बहीण, लाडके भाऊ आणि जेष्ठ नागरिक माझ्या पाठीशी आहेत तोवर मला काही चिंता नाही. लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय सरकार गप्प बसणार नाही. सावत्र भावापासून फक्त सावध राहा. लाडकी बहीण योजनेत थोडा जरी खोडा घातला तर कोल्हापुरी जोडा दाखवा.
मुख्यमंत्री सुरक्षित बहीण योजना देखील सुरू आहे, महिलांच्या वरील अत्याचार सरकार सहन करणार नाही. अत्याचार करणाऱ्यांना फाशी शिक्षा दिली जाईल असं एकनाथ शिंदे म्हणाले. दलापूरमधील आरोपी अक्षय शिंदे हा माणूस नव्हता, हैवान होता. त्याचा विरोधकांना पुळका येऊ लागला. पोलिसांवर हल्ला होत असताना ते बघत बसणार का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला.
सुहास बाबर यांच्या पाठीशी ठामपणे उभा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गोमातेला राज्य मातेचा दर्जा देण्यात आला आहे आणि आता काळ्या मातीचे भूमिपूजन करून करून मातीचे पांग फेडले आहे. एकावर एक योजना आणणारे सरकार यापूर्वी तुम्ही कधी पाहिले नसेल. अनिल भाऊ बाबर यांची जी स्वप्न होती ती आता सुहास बाबर यांनी पूर्ण करायचे आहेत. सुहास बाबर यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे ठामपणे उभा आहे. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरमध्ये करण्यासाठी प्रयत्न करू.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:17 01-10-2024