मराठी भाषेतून शिक्षण विद्यार्थ्याला समृद्ध करते; उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांचे प्रतिपादन

◼️ दामले विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी

रत्नागिरी : मराठी भाषेतून शिक्षण विद्यार्थ्याला समृद्ध करते, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे यांनी केले आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाअंतर्गत मंगळवारी शहरातील रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयात ग्रंथप्रदर्शन व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या .

यानिमित्त आयोजित व्यासपीठावर मराठी भाषा समिती सदस्य आणि कवी केशवसुत स्मारक समिती मालगुंड रत्नागिरीचे अध्यक्ष गजानन पाटील, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एन. कासार, कोमसापचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, कोमसाप केंद्रीय कार्यवाह माधव-अंकलगे, अरुण मोरये, दामले विद्यालयाचे मुख्याध्यापक भगवान मोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी रत्नागिरी नगर शिक्षण मंडळा तर्फे सुमारे एक हजार पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन सौ साठे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत दामले विद्यालयातर्फे ग्रंथदिंडीचे मारुती मंदिर परिसरात आयोजन करण्यात आले.

आपले शिक्षण मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून आता आपण उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचू शकलो . त्यामुळे मराठी शिक्षणही आपल्याला उच्च पदापर्यंत पोहोचवते, असे मत सौ. शुभांगी साठे यांनी व्यक्त केले.

श्री. गजानन पाटील यांनी मराठी भाषेचा अभिजात भाषेपर्यंतचा प्रवास मुलांसमोर सोप्या भाषेत उलगडला. विद्यार्थ्यांनी रोज वाचण्याची सवय लावण्याची गरज शिक्षणाधिकारी श्री. कासार यांनी प्रतिपादित केली.

दामले विद्यालयासारखी मराठी माध्यमाची शाळा इतक्या उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण क्षेत्रात चौफेर आपला ठसा उमटवते, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. दामले विद्यालयाचे काम आदर्शवत असल्याचे सौ. साठे म्हणाल्या. आभार मुख्याध्यापक श्री . मोटे यांनी मानले .

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 29-01-2025