खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मालवाहू टँकर दरीत कोसळला. ब्रेक निकामी होऊन मागे घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडला. अपघातात चालक सुदैवाने बचावला असून, टँकरचे नुकसान झाले आहे. मुंबईहून चिपळूणच्या दिशेने टँकर जात असताना भोस्ते घाटात अचानक ब्रेक निकामी झाला. टँकर मागे घेत असतानाच थेट दरीत कोसळला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले. टँकरमधील रसायन इतरत्र पसरल्याच्या शक्यतेने यंत्रणांची धावाधाव सुरू झाली मात्र टँकरमधील रसायन बाहेर पडले नसल्याची बाब निदर्शनास येताच साऱ्यांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर अपघातांची सुरू असलेली मालिका कायम आहे. पंधरा दिवसांपूर्वीच मालवाहू ट्रक थेट संरक्षक भिंतीवर आदळला. मध्यभाग उखडला होता. यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याने भोस्ते घाटात संरक्षक भिंतीची दुरुस्ती करण्याच्यादृष्टीने कुठलीच ठोस पावले उचलली नसल्याने वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 29/Jan/2025














