चिपळूण : कोट्यवधी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेल्या शहरातील पवन तलाव मैदानावर पुन्हा एकदा धनदांडग्या व्यक्तींच्या उडाणटप्पू मुलांनी चारचाकी वाहन घेऊन मैदानावर स्टंटबाजी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तिघांवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच ही घटना घडली.
नूतनीकरणांतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून पवन तलाव मैदान चांगल्या दर्जाचे करण्यात आले आहे. संपूर्ण मैदानाला संरक्षक भिंत व दोन प्रवेशद्वार आहेत. त्यात मुख्य प्रवेशद्वाराला लागून छोटे प्रवेशद्वार आहे. या मैदानाच्या वापर करण्याच्या वेळेत प्रवेशद्वार उघडले जाते. त्यानंतर रात्रीच्यावेळी प्रवेशद्वार बंद केले जाते तसेच या ठिकाणी सुरक्षारक्षक आहे. अशावेळी मुख्य प्रवेशद्वार बंद करून त्या नजीकचे प्रवेशद्वार उघडे ठेवले जाते. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी चिपळूणमधील मिलिंद गोंधळी, शशिकांत साळवी, इमान रूमानी यांच्या नावे असलेल्या तीन वाहनांनी पवन तलाव मैदानावर स्टंटबाजी करून मैदानाची नासधूस केली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर तिघांना प्रत्येकी २० हजार रुपयांचा दंड थोटावण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 30/Jan/2025













