राजापूर : रायपाटणला अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्याची मागणी

राजापूर : रायपाटण हे ऐतिहासिक गाव असून, त्याला मोठा वारसा लाभला आहे. यापूर्वी शासनाच्या धोरणानुसार ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गावांचा तालुक्यासह जिल्ह्याच्या मुख्यालयासाठी जसा विचार झाला तशाच प्रकारे शासनाने रायपाटण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात अप्पर तहसील कार्यालय मंजूर करून या इतिहासकालीन गावाचा सन्मान वाढवावा, अशी मागणी रायपाटणवासीयांकडून राजापूरच्या प्रांताधिकारी डॉ. जैस्मिन यांच्याकडे करण्यात आली.

रायपाटण ग्रामपंचायत येथे झालेल्या विशेष बैठकीला राजापूरच्या उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) डॉ. जस्मिन, तहसीलदार विकास गंबरे, रायपाटणचे सरपंच नीलेश चांदे उपसरपंच विजय जड्यार सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आमकर, महसूल विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. राजापूर तालुक्यात नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करणार असून, त्यासाठी रायपाटण ग्रामपंचायतच्या माध्यमातून यापूर्वी तसा मागणीचा परीपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने प्रांताधिकारी डॉ. जस्मिन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रायपाटण ग्रामपंचायतमध्ये विशेष बैठक झाली. या बैठकीमध्ये अप्पर तहसील कार्यालयासाठी रायपाटण ग्रामपंचायत कार्यक्षेत्र कसे योग्य आहे, हे सांगण्यात आले. रायपाटणचे माजी सरपंच संदीप कोलते, जिजामाता विद्यामंदिर रायपाटणचे माजी मुख्याध्यापक विनोद करंदीकर, एमकेसीएल कॉम्प्यूटरचे संचालक आणि रायपाटणचे सुपुत्र संतोष कोलते यांनी रायपाटण गावातील उपलब्ध सुविधा, आवश्यक असलेली मुबलक प्रमाणातील जमीन यावर मुद्देसूद मांडणी केली. माजी सरपंच संदीप कोलते यांनी राजापूर तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र रायपाटण तालुका निर्मिती शासनाने कराबी, यासाठी सन १९९० पासून कसे प्रयत्न सुरु आहेत, त्याचा ओझरता आढावा घेतला.

अधिवेशन काळात विधानसभेसह विधान परिषदेच्या अनेक सदस्यांनी राजापूर तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र रायपाटण तालुका निर्मितीबाबत सभागृहात केली गेलेली मागणी आणि त्याला तत्कालीन महसूल मंत्र्यांसह शासकीय स्तरावरून कशी उत्तरे दिली गेली, त्याचे अवलोकन केले.

जिजामाता विद्यामंदिर रायपाटणचे माजी मुख्याध्यापक विनोद करंदीकर यांनी रायपाटण गावच्या इतिहासाचे ओझरते अवलोकन करताना इतिहासकालीन रायपाटणचे महत्त्व अधोरेखित केले.

शासनाकडे अहवाल सादर करणार
रायपाटणवासीयांची भूमिका जाणून घेतल्यानंतर आपण शासनाकडे अहवाल सादर करू, अशी ग्वाही प्रांताधिकारी डॉ. जस्मिन यांनी दिली. त्यानंतर रायपाटण परिसरातील काही ठिकाणाची पाहणी करून त्या पाचलला रवाना झाल्या. पाचल ग्रामपंचायतच्यावतीने देखील अप्पर तहसील कार्यालयासाठी मागणी करण्यात आल्याने पाचलमध्येही बैठक झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 30/Jan/2025