रत्नागिरी : विद्यार्थी सुरक्षा धोरणानुसार सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये अद्यापही सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आलेली नाही. याला शिक्षण विभागाचे अधिकारीच जबाबदार असल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून शालेय मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यानुसार, आता सरकारनेही यावर कडक पावले उचलली आहेत. यामुळे राज्यातील खासगी व्यवस्थापन, जिल्हा परिषदांसह सर्व शाळांसाठी शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या तरतुदीचे पालन न करणाऱ्या शाळांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत, अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसवण्याबाबत कार्यवाही करणे आवश्यक आहे. शाळा व परिसरात केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे पुरेसे नसून ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणेही आवश्यक करण्यात आले आहे. फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास याबाबत स्थानिक पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवरच सोपवण्यात आली आहे.
ज्या शाळा सीसीटीव्ही बसविणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई होईल. माध्यमिक शाळांना सीसीटीव्ही बसवण्यासाठी सक्ती करण्यात आली, मात्र प्राथमिक शाळांमध्ये एवढे महिने उलटूनही अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे का बसवण्यात आले नाहीत, असा सवाल पालकांकडून विचारण्यात येत आहे.
.. अन्यथा कारवाईचा बडगा
सर्व शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. ज्या शाळांकडून हलगर्जीपणा करण्यात येईल, अशा शाळेचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारख्या कारवाईच्या मार्ग शालेय शिक्षण विभागाकडून अवलंबण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 30/Jan/2025













