संगमेश्वर : प्रचितगडावर स्वच्छता मोहिम

संगमेश्वर : सह्याद्रीचा मुकुटमणी शृंगारपूरचा पहारेकरी म्हणून ओळख असलेल्या किल्ले प्रचितगडावर संगमरत्न फाउंडेशनच्या वतीने दोन दिवस स्वच्छता मोहीम राबवली. दुर्गप्रेमी अल्पेश सोलकर यांच्यासोबत ४० हून अधिक शिवप्रेमींनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यामुळे प्रचितगडाने मोकळा श्वास घेतला.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या मावळ्यांनी शनिवारी (ता. २५) दुपारपासूनच प्रचितगडाचे मुख्य प्रवेशद्वारपासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. हे प्रवेशद्वार मातीच्या ढिगाऱ्याखाली गायब झालेले होते. तिथे ऊन्हातान्हाची पर्वा न करता अंगमेहनत करून दुर्गप्रमींनी प्रवेशद्वार परिसर मोकळा केला. गडावर वाढलेले कारवीचे जंगल साफ केले. गडावरील गुहेतील तलावाचा परिसर स्वच्छ केला.

तसेच मंदिराचीही साफसफाई केली. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी गडावर ध्वजवंदन कार्यक्रम झाला. त्यानंतर पुन्हा मोहीम सुरू झाली. दुपारी १२ वा. या मोहिमेची सांगता झाली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सर्व दुर्गाप्रमी शृंगारपुरात परतले. शृंगारपूर ग्रामविकास मंडळ मुंबईच्या कार्यकारी मंडळ आणि काही सभासदांच्या वतीने त्या सर्वांचे आभार मानण्यात आले. या मोहिमेसाठी मंडळाचे अध्यक्ष चव्हाण, विनोद म्हस्के यांनी चांगले सहकार्य केले. सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयात दुर्गप्रमींच्या सत्काराचा कार्यक्रम संगमरत्न फाउंडेशनतर्फे करण्यात आला. या वेळी सरपंच विनोद पवार, मंडळाचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच मंडळाच्या वतीने आभारपत्र देण्यात आले. या वेळी दुर्गाप्रमींनी पोवाडा सादर केला. तसेच, पुन्हा एकदा अशीच मोहीम राबवण्याचे आश्वासन दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 30/Jan/2025

Tata sierra