दापोली : कोकण कृषी विद्यापीठ व सारथी संस्था यांच्यात ड्रोन प्रशिक्षणाविषयी सामंजस्य करार

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्यामध्ये रिमोट पायलट प्रशिक्षण केंद्र यांच्यात ड्रोन प्रशिक्षणाविषयी सामंजस्य करार झाला. यावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे आणि सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी सह्या केल्या.

ड्रोन संबंधित डीजीसीए प्रमाणित रिमोट पायलट प्रशिक्षण देऊन शेतकरी, उद्योजक आणि रोजगार शोधणाऱ्या नवतरुणांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र प्राप्त करून देणे हा कराराचा मुख्य उद्देश आहे. याप्रसंगी सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी सारथी संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतकऱ्यांना आणि नवतरुणांना रोजगारासाठी संधी उपलब्ध होणार असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाला सारथीचे कृषी कार्यकारी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, पीसीबी एअरो हबचे संचालक प्रणवकुमार चिट्टे, विद्यापीठाचे संचालक, संशोधन आणि विस्तार शिक्षण डॉ. पराग हदळणकर, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे आदी उपस्थित होते.

मजुरांच्या कमतरतेवर ड्रोनचा उपाय
कोकणातील कृषी आणि कृषीउद्योग क्षेत्रासंबंधित नवतरुणांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यास कोकणातील आंबा, काजू, भात व इतर पिकांमध्ये फवारणी किंवा इतर कामे करण्यासाठी सद्यःस्थितीत भासत असलेली मजुरांच्या कमतरतेवर ड्रोनच्या सहाय्याने फवारणी आणि इतर कामे केल्यास मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो. सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:29 PM 30/Jan/2025