मंडणगड : ‘शिगवण- दंडनगरी’ रस्त्याचे काम पोलिस बंदोबस्तात

मंडणगड : मंडणगडमधील शिगवण-आंबवणे बुद्रुक दंडनगरी नवीन रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या नवीन रस्त्याला जाणाऱ्या जमिनीबाबत जागामालक ग्रामस्थांनी हरकत घेतल्याने पोलिसांना पाचारण करून काम सुरू ठेवल्याची घटना घडल्याने या कृतीबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम या योजनेंतर्गत आंबवणे बुद्रुक ते दंडनगरी या रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. हा रस्ता पूर्णपणे नवीन आणि जास्त रुंदीचा असल्याने रस्त्याला लागणारी जमीन अधिग्रहण करणे गरजेचे होते. शिगवण ग्रामपंचायतीमधून मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावर पूर्वी कच्चा रस्ता येथील गावकऱ्यांच्या सोयीसाठी उपलब्ध होता. त्यावेळी केवळ या मार्गासाठी आवश्यक १२ फूट रुंदी व ४ कि.मी. लांब रस्त्यासाठी येथील रस्त्याला जाणाऱ्या जागा मालकाच्या संमत्तीने ग्रामपंचायतीच्या २३ नंबरमध्ये रस्त्यासाठी जागा अंतर्भूत करण्यात आली होती. मात्र, याच ठिकाणी नवीन रस्त्याचे काम सुरू केले असताना संबंधित जागा मालकांनी तत्कालीन वेळी संमती दिलेल्या जागेपेक्षा अधिक जागेत डांबरीकरणासाठी रुंदीकरण सुरू केले आहे, असे या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जागेचे अधिग्रहण करून आमच्या जागेचा मोबदला आम्हाला मिळणे आवश्यक आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग पोलिसांना बोलावून दबाव टाकत आहे, असे या ग्रामसवाचे म्हणणे असून, चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले काम काम तत्काळ थांबवावे.

जागेचे खोदकाम करून केलेल्या नुकसानाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जागामालकांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्याशी संपर्क साधला असता यासंदर्भात त्यांनी आम्ही विकासकाम करत आहोत. कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, या कामासंदर्भात एकूण घटनाक्रमाची सविस्तर माहिती देताना त्यांनी टाळाटाळ केली. तसेच उपविभागीय अभियंता महेश वास्ते यांच्याशी संपर्क केला असता यासंदर्भात अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

रस्त्याचे काम दडपशाही पद्धतीने सुरू आहे. संविधानिक मार्गाने निवेदने देऊन दुर्लक्ष करण्यात येत आहे. मूळ रस्ता मार्गाला बगल देण्यात आली असून, बेकायदेशीररीत्या त्याची रुंदी वाढविण्यात येत आहे यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. रस्त्याच्या कामाला आमचा विरोध नसून तो चुकीच्या पद्धतीने करण्यात येत आहे. वाढीव रुंदीचे अधिग्रहण करून शेतकऱ्यांना मोबदला द्यावा. किरण धामणे, बाधित शेतकरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 31/Jan/2025