मंडणगड आगाराला नव्या एसटी गाड्यांची प्रतीक्षा…

मंडणगड : मंडणगड एसटी आगाराचा गाडा जुन्या आणि वारंवार बिघाड होणाऱ्या एसटी गाड्यांवरच हाकला जात आहे. यामुळे आगाराचे नियोजन कोलमडत असून, ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. शेजारील दापोली आगाराला नव्या गाड्या मिळाल्या मात्र मंडणगड आगाराला अद्यापही नव्या गाड्यांची प्रतीक्षाच लागून राहिली आहे.

मंडणगड आगाराच्या माध्यमातून ग्रामिण भागात सुरू असलेली वाहतूक व आगाराचा नैमित्तीक कारभार पाहता आगारव्यवस्थापकांसह कार्यरत सर्व कर्मचारी हा डेपो शक्य तेवढ्या लवकर बंद करण्याकरिता काम करीत आहेत का, असा प्रश्न तालुकावासीयांमधून उपस्थित केला जात आहे. आगारातील गाड्या वेळेवर सुटत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी अडचण होते. तसेच रुग्णांनाही वेळेवर दवाखान्यात पोहचता येत नाही.

सुरक्षित, वेळेवर व समयोचीत प्रवास हा मंडणगड तालुक्यातील नागरिकांचा अधिकार नाही का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे. तालुक्यात नव्या गाड्यांची मागणी अनेक वर्षांपासून आहे. एसटी प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोईच्याच लांब पल्ल्यांच्या गाड्या सोडल्या जातात. याकरिता भारमान असलेल्या प्रवासी फेऱ्या मात्र बंद केल्या जातात. याचबरोबर चांगले उत्पन्न देणाऱ्या गाड्या भारमान कमी असल्याचे कारण सांगून बंद का केल्या जातात, हे न उलगडणारे कोडे आहे. खराब रस्त्यांचे कारण पुढे करत या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या संदर्भात लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी एस.टी. विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची जाहीर कानउघाडणी करूनही परिस्थितीत फारसे बदल झालेले नाहीत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 31/Jan/2025