लांजा : जिल्हा प्रशासनाकडून डम्पिंग ग्राउंडच्या जागेचे फेरतपासणी पत्र देऊनही राजापूर तहसीलदार जागेवर तपासणीसाठी येणार नसतील तर ही फेरतपासणी नव्याने करण्यात यावी आणि त्यासाठी वेगळ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी कोत्रेवाडी ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहेत.
कचरा डम्पिंग ग्राउंडच्या जागेची फेरतपासणी करण्याचा महिनाभराचा कालावधी जवळपास संपत आल्यामुळे फेरतपासणीसाठी विलंब का होत आहे? असा प्रश्न कोत्रेवाडी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. प्रशासन याबाबत दिरंगाई करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. लांजा नगरपंचायतीमार्फत कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे; मात्र हा ग्राउंड लोकवस्तीपासून अतिशय जवळ असल्याने लोकांनी याला विरोध केला असून, या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी आंदोलने, उपोषणदेखील केली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा डंपिंग ग्राउंड लोकांच्या आरोग्याच्यादृष्टीने घातक ठरत असेल तर संबंधित जागेची फेरतपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून फेरतपासणी अधिकारी म्हणून राजापूर तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सदर जागेची फेरतपासणी करून त्याचा अहवाल एका महिन्याच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
ग्रामस्थांनी यानंतर राजापूर त’हसीलदारांची भेट घेऊन प्रत्यक्ष जागेची लोकांसमवेत पाहणी करावी, लोकांच्या मागणीनुसार, त्यांच्या तक्रारीनुसार या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून लोकांची बाजू समजावून घ्यावी आणि मगच आपला अहवाल शासनाकडे सुपूर्द करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. तसे निवेदनदेखील ग्रामस्थांनी दिले होते; मात्र ते स्वीकारण्यास राजापूर तहसीलदारांनी नकार दिला होता, असे कोत्रेवाडी ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे जर आता जागेची फेरतपासणी करण्याची मुदत जवळपास संपत आल्याने फेरतपासणीसाठी विलंब का केला जात आहे? असा सवाल कोत्रेवाडी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
डम्पिंग ग्राउंडच्या जागेची फेरतपासणी करावी, अशी आमची मागणी ही मागणी मान्य न झाल्यास आम्हाला वेगळा पवित्रा घ्यावा आहे लागेल. सतीश पेडणेकर, कोत्रेवाडी, लांजा
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 31/Jan/2025














