चिपळूण : पावसाळ्यात वाशिष्ठी नदीचे पाणी शहरात शिरणाऱ्या शंकरवाडी-मुरादपूर भागातील नलावडा बंधाऱ्याच्या ठिकाणी आता भली मोठी पूर संरक्षक भिंत उभारली जात आहे. जलसंपदा विभागामार्फत पावसाळ्यापूर्वी ही भिंत उभी करण्याचे उद्दिष्ट संबंधित ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहे. यामुळे या कामाला चांगलीच गती प्राप्त झाली आहे. बुधवारी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता नाईक यांच्यासह अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करत ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शहरामध्ये वाशिष्ठी नदीच्या काठावर शंकरवाडी-मुरादपूर या दोन वाड्यामध्ये कमी उंचीचा सखल भाग आहे. या नदीच्या वळणावर संरक्षक भितीचे (नलावडा बंधारा) जुने दगडी बांधकाम पूर्वी केलेले होते. परंतु २००५ च्या पुरामुळे बंधारा वाहून गेला. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात पुराचे पाणी शिरून वित्तहानी झाली.
महापुरातही या भागासह शहराला मोठा फटका बसला. यामुळे या ठिकाणी पूर संरक्षक भिंत उभारली जावी, अशी मागणी चिपळूण बचाव समितीसह स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्याकडून सातत्याने होत होती. पावसाळ्यापूर्वी हा प्रकल्प मार्गी लावावा, अशा सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीला दिल्या आहेत, त्यानुसार ठेकेदार कंपनीने कामाची गती वाढवली आहे. सध्यस्थितीत २० कामगार, ३ पोकलेन, ४ डम्पर, ब्रेकर, ५ टीएम अशी यंत्रसामुग्री कार्यरत आहे. तर कंपनीचा स्वतःचा प्लांट असून, या सर्व कामावर प्रोजेक्ट मॅनेजर दीपक जाधव लक्ष ठेऊन आहेत.
दरम्यान, बुधवारी या कामाची जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता नाईक, सुर्वे व कार्यकारी अभियंता सलगर यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच कामासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना देखील कंपनीला केल्या आहेत.
२० कोटी २१ लाखांचा निधी
चिपळुणातील मिलिंद खातू यांच्या प्रीमियर सिव्हील कॉन्ट्रॅक्ट चिपळूण या कंपनीला या कामाचा ठेका मिळाला आहे. तब्बल २० कोटी २१ लाखांचा निधी आ. शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला आहे. दि. २३ डिसेंबर २०२४ रोजी आ. निकम यांच्या हस्ते नलावडा बंधारा पूर संरक्षक भिंत कामाचे भूमिपूजन झाले. गेल्या दीड महिन्यापासून ही भिंत उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. वाशिष्ठी किनारी २०० मीटर लांबी व ९ ते १० मीटर उंचीची ही भित येत्या पावसाळ्यापूर्वी नागरिकांचे पुरापासून संरक्षण करणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 03/Feb/2025














