रत्नागिरी : माणसाचे समग्र जीवन उलगडणारी आणि विज्ञान तंत्रज्ञान यांनाही भुरळ पडणारी प्राचीनतम साहित्यकृती अर्थात वेद. या वेदांची शिकवण ही केवळ धार्मिक किंवा कर्मकांडावर आधारित नसून, ती नैतिकता, समाजव्यवस्था, पर्यावरण, आरोग्य, अध्यात्म आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्याशीही संबंधित आहे.
अर्थात ती सर्वव्यापी आहे. अशाप्रकारचे आदर्शवत वेद वैदिक संमेलनाच्या निमित्ताने जाणून घेण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळणार आहे.
महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान (उज्जैन) आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे (रामटेक) भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्राच्या वतीने येत्या ७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान क्षेत्रीय वैदिक संमेलन माधवराव मुळे भवनात होणार आहे. ७फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता शहराच्या मुख्य रस्त्यांवरून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. वैदिक परंपरेचा आधुनिक जीवनात योग्य अवलंब केल्यास मानवी जीवन समृद्ध व आनंददायी होईल. याकरिता या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रातर्फे केले आहे.
आधुनिक काळातही वेदाध्ययन उपयुक्त आहे. वेदांतातील विचारधारा नेतृत्वगुण, मानसिक शांतता आणि आत्मविकासासाठी उपयुक्त आहे. भगवद्गीतेतील कर्मयोगाचे तत्त्व कॉर्पोरेट व्यवस्थापनात लागू करता येते. वेदांमधील समत्व आणि सर्वसमावेशक विचार लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांशी सुसंगत आहेत. डॉ. दिनकर मराठे, संचालक, रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 03/Feb/2025












