रत्नागिरी : समुद्रात टाकलेल्या कृत्रिम भित्तीकांबाबत मच्छीमारांमध्ये संशय

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवरील नामशेष होणाच्या मार्गावर असणाऱ्या माशांची प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी हजारो कृत्रिम भित्तीका समुद्रात टाकण्यात आल्या. कोट्यवधी रुपये खर्च करून समुद्रात टाकलेल्या या कृत्रिम भित्तीका निश्चित केलेल्या प्रमाणातच टाकल्या गेल्या आहेत का ? त्याचबरोबर त्यांची गुणवत्ता कशी आहे? याचा शोध घेण्याची मागणी मच्छीमारांकडून होवू लागली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १६७ कि.मी. च्या समुद्र किनाऱ्यावरील ४४ ठिकाणी या कृत्रिम भित्तीका टाकण्यात आल्या आहेत.

कोकण समुद्रकिनारपट्टीवरील अनेक प्रमुख माशांच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा निष्कर्ष निघाला होता. यावर उपाय म्हणून खडी, सिमेंट, स्टील व रेतीने बनविलेल्या कृत्रिम भित्तीका बनवून त्या समुद्राच्या १० वाव अंतराच्या आत टाकून माशांना संरक्षित करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार कोकण किनारपट्टीवरील १८० ठिकाणी या कृत्रिम भित्तीका टाकण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यातील रत्नागिरी समुद्रकिनारी ४, जयगड १०, दाभोळ १२, गुहागर १२ आणि साखरी नाटेतील ६ ठिकाणच्या समुद्रकिनारी कृत्रिम भित्तीका टाकण्यात आल्या आहेत. एका ठिकाणी २०० प्रमाणे ४४ ठिकाणी या कृत्रिम भित्तीका टाकण्यात आल्या आहेत.

वर्षभरापूर्वी कृत्रिम भित्तीका टाकल्यानंतर त्यांचा मच्छीमार नौकांना अडथळा होत होता. त्यामुळे काही ठिकाणी विरोधसुद्धा झाला. परंतू आता मच्छीमार नौकांना अडथळा होत नसल्याने त्या कृत्रिम भित्तीका समुद्राच्या पाण्यात विरघळून गेल्या की काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अप्रत्यक्षरित्या कोट्यवधी रुपये खर्च करून बनवलेल्या कृत्रिम भित्तीका निकृष्ट दर्जाच्या होत्या का ? असा संशय व्यक्त केल्या जात आहेत.

वर्षभरात या कृत्रिम भित्तीकांचा माशांच्या कोणत्या प्रजार्तीसाठी फायदा झाला, याचाही त्यांच्या गुणवत्तेची शहानिशा करावी, अशी मागणी मच्छीमारांकडून केली जात आहे. काँक्रिटच्या भित्तीका बनवताना त्यावर पुरेसे पाणी मारले नाही तर त्या निकृष्ट भित्तीका समुद्राच्या पाण्यात विरघळण्याची भीती असते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 04/Feb/2025