रत्नागिरी : भारताला ऊर्जा स्वावलंबन बनवण्यासाठी सरकारने एक कोटी निवासी घरावर ‘रूफ ऑफ सोलर’ बसवण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातील पाच हजार व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या २२ गावे दृष्टिक्षेपात असून इतरही छोट्या लोकसंख्येची गावे या योजनेत समाविष्ट केली जातील.
पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत वीजबिल प्रथम शुन्यावर आणणे आणि पुढे त्यातून वीज विकून उत्पन्नाची दुहेरी संधी देणारी ही योजना आहे. या योजनेतून पुढील काही काळात देशाला सौर विजेच्या वापराखाली आणण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. ही योजना महावितरणच्या घरगुती वीज ग्राहकांना लागू आहे. छतावरील सौरऊर्जा पॅनेलद्वारे वीजनिर्मिती घरगुती वापरापेक्षा जास्त झाल्यास वीजबिल शून्य येईल. त्याच जोडीने जास्त निर्मित वीज महावितरणला विकून उत्पन्न मिळवण्याची संधीदेखील या योजनेंतर्गत मिळाली आहे. यामुळे सौरऊर्जा योजनेत सहभागी होऊन हरित ऊर्जा निर्माणकर्ते बनत पर्यावरण संरक्षणात ग्रामस्थ आपला वाटा उचलणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९७ हजार ७०० निवासी ग्राहकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना एक किलोवॅटपर्यंत ३० हजार २ किलोवॅटकरिता ६० हजार आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त यासाठी कमाल अनुदान रक्कम ७८ हजार रुपये आहे. गृहनिर्माण संस्था व घरसंकुलासाठी ९० लाख रुपये अनुदान ठेवण्यात आले आहे. यासाठी अनुदानव्यतिरिक्त उभारावयाच्या रकमेसाठी विविध बँकांकडून कमी व्याजदरात कर्जाची व्यवस्था करण्यात आली आहे.
ही गावे बनणार सौरग्राम
दापोली तालुक्यातील जालगाव, हर्णे, दाभोळ, गिम्हवणे, पाज, बुरोंडी, खेड तालुक्यातील भरणे, चिपळूण तालुक्यातील खेर्डी, सावर्डे, पोफळी तर गुहागर तालुक्यातील पालशेत, पाटपन्हाळे, संगमेश्वर तालुक्यातील कडवई, रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव, नाचणे, गोळप, कुवारबाव, कर्ला, पावस व राजापूर तालुक्यातील सागवे अशा २२ गावांचा समावेश असणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 04/Feb/2025














