दावोस करारातून कोकणात ८५ हजार १३७ कोटींचे नवे प्रकल्प

रायगड : दावोसमधील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्रात परदेशी आणि देशातील अशा विविध ५४ कंपन्या आणि धोरणात्मक सहकार्याचे ७ असे एकूण ६१ सामंजस्य करार झाले. त्यामध्ये कोकणात एकूण ८५ हजार १३७ कोटींचे एकूण सहा प्रकल्प होणार असून त्यातून एकूण ४३ हजार ८५० नवे रोजगार कोकणात उपलब्ध होणार आहेत. परिणामी, कोकणातून मुंबई पुण्यात व अन्य जिल्ह्यात नोकरीच्या निमीत्ताने होणारे स्थलांतर कमी होऊ शकणार आहे, असा अशावाद निर्माण झाला आहे.

रायगडमध्ये ३२ हजार २०० कोटींची गुंतवणूक कोकणात होणाऱ्या या सहा प्रकल्पांपैकी रायगड जिल्ह्यात ३२ हजार २०० कोटी रुपये गुंतवणुकीचे तीन प्रकल्प होणार असून त्यातून एकूण ४ हजार ३०० नवी रोजगार निर्मिती होणार आहे. यामध्ये टेम्बो लि. कंपनीचा संरक्षण क्षेत्रातील १००० कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प असून त्यातून ३०० नवे रोजगार निर्माण होणार आहेत. इंडोरामा लि. कंपनीचे दोन प्रकल्प रायगडमध्ये होत आहेत. त्यांतील पहिला प्रकल्प वस्त्रोद्योग क्षेत्रातील असून २१००० कोटी रुपये गंतवणुकीच्या या प्रकल्पांतून १००० नवी रोजगार निर्माती होणार आहे. दुसरा प्रकल्प १०२०० कोटी रुपये गुंतवणुकीचा टेक्निकल टेक्स्टाईल्स क्षेत्रातील असून, त्यांतून ३००० नवे रोजगार निर्माण होणार आहेत.

पालघरमध्ये स्टिल प्रकल्प
पालघर जिल्ह्यात विराज प्रोफाईल्स प्रा. लि. कंपनीचा १२००० कोटी रुपये गुतवणूकीचा स्टिल अॅन्ड मेटल्स क्षेत्रातील प्रकल्प होत असून त्यातून ३५०० नवे रोजगार निर्माण होणार आहे.

स्थानिक तरुणांनाच रोजगार संधी मिळण्यासाठी नियोजन
कोकणात दावोस कराराच्या माध्यमातून मोठ्या गुतवणुकीचे मोठे प्रकल्प येणार आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार, परंतू ती रोजगार संधी कोकणातील स्थानिक युवकांना मिळाली पाहिजे, याकरिता या उद्योगांमध्ये लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याचा निर्णय जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रण (दिशा) समितीची बैठकीत घेतला असल्याची माहिती रायगड रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मिती करण्याकरिता रायगडमध्ये प्रशिक्षण संस्था उभारणे प्रस्तावित करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात दोन मोठे प्रकल्प
रत्नागिरी जिल्ह्यात ४० हजार ९३७ कोटी गुंतवणुकीचे दोन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात होणार असून त्यांतून ३६,०५० नवे रोजगार उपलब्ध होणार आहेत. या दोन प्रकल्पांमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर्स लि. कंपनीचा संरक्षण क्षेत्रातील १६ हजार ५०० कोटी रुपये गुंतवणूकीचा प्रकल्प होणार असून त्यातून २४५० नवे रोजगार निर्माण होणार आहेत. तर दुसरा प्रकल्प व्हीआयटी सेमिकॉन्स लि. कंपनीचा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील २४हजार ४३७ कोटी रुपये गुंतवणूकीचा प्रकल्प असून त्यांतून ३३ हजार ६०० नवीन रोजगारांची निर्मिती होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:56 PM 05/Feb/2025