अनुदानित शिक्षकांच्या टप्पावाढीची तरतूद करावी : अॅड. तुकाराम शिंदे

माखजन : १४ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्गमित झालेल्या अंशतः अनुदानित शिक्षकांच्या टप्पावाढीच्या शासन निर्णयाची येत्या अधिवेशनात तरतूद व्हावी, यासाठी महाराष्ट्र कुणबी मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेनेचे राज्य समन्वयक अॅड. तुकाराम शिंदे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली.

या भेटी प्रसंगी शिक्षक समन्वय संघाचे प्रा. अनिल परदेशी, प्रा. संतोष वाघ, प्रा. कर्तारसिंग ठाकूर, प्रा. राहुल कांबळे, गजानन खैरे आदी उपस्थित होते. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मंत्री मंडळाच्या १० ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत निर्णयानुसार व १४ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयास अनुसरून राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक शाळांना वाढीव २०टक्के टप्पा वाढीसाठी लागणारा निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पावसाळी अधिवेशनात सभागृहात तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जून २०२४ पासून फरकासह २० टक्के वाढीव टप्पा दिला जाईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार लागणारा निधी येत्या अधिवेशनात मंजूर करून राज्यातील ६३ हजार अंशतः शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शिवाय काही अडचणीमुळे त्रुटीमध्ये अडकलेल्या शाळांना व ज्यांनी ३० दिवसाच्या आत त्रुटी पूर्तता केली आहे, अशा शाळांना समान टप्यावर आणण्यासाठी लागणारा निधी देखील या अधिवेशनात मंजूर करावा, अशी मागणी केली. यावेळी दादा भुसे यांनी १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी शिक्षण विभाग योग्य दिशेने कार्यवाही करत आहे. अधिवेशनात अंशतः अनुदानित शिक्षकांना न्याय दिला जाईल, असे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 06/Feb/2025

Ratnagiri Khabardar add image