साडवली : देवरूख नजीकच्या हातीव येथे मृत बिबट्या आढळून आल्याची घटना रविवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या बिबट्याचा उपासमारीने मृत्यू झाला असावा, असा अंदाज वन विभागाने वर्तवला आहे.
याबाबत वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हातीव फणस थांबा येथे मृत बिबट्या असल्याची वन विभागाला मिळाल्यावर रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे वनपाल तौफिक मुल्ला यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी जावून पाहणी केली व पंचनामा केला तसेच मृत बिबट्याला ताब्यात घेतले. या नंतर दाभोळे येथील पशुधन अधिकारी डॉ. सोनाली शेट्ये यांच्यामार्फत या मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले.
मृत बिबट्याच्या अंगावर जखमा असल्याने या बिबट्याची वन्यप्राण्याशी झटापट झाली असावी यात त्याची लढण्याची ताकद संपुष्टात आल्याने तसेच उपासमारीने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनपाल मुल्ला यांनी व्यक्त केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 10-02-2025














