राजापूर : समाज आणि कायदा हा एकमेकांशी जोडलेला आहे. त्यामुळे समाजात होत असलेल्या बदलाप्रमाणे कायद्यातही बदल होत असतात. भारतात नव्याने अंमलात आलेल्या कायद्यांच्या माध्यमातून न्यायाची बाजू अधिक भक्कम करतानाच अनेक कठोर तरतुदींमुळे नागरिक व देशहिताचे संरक्षण होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन लांजा न्यायालयाचे सरकारी वकील तृणाल सावंत यांनी येथे केले.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दल व राजापूर पोलीस ठाण्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष्य अधिनियम या नवीन कायद्यांबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यशाळेत ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, अॅड. मिलिंद चव्हाण, अॅड. सुनयना देसाई, राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, वनपाल जयराम बावदाणे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे आदी उपस्थित होते.
भारतीय न्याय संहितेतंर्गत झालेल्या नवीन कायद्यांतर्गत ३० कलमांमध्ये शिक्षा वाढविण्यात आली आहे, ८३ कलमांमध्ये द्रव्य दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे. २३ कलमांमध्ये कमीत कमी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तर १०० कलमे ही मूळ कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे अॅड. सावंत यांनी सांगितले.
सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांनी केले. प्रारंभी पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या शिबिराला राजापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, जी. आर. कुलकर्णी, गायत्री हर्डीकर, कोदवली सरपंच भोसले, अमृत तांबडे आदींसह व्यापारी, पोलीस पाटील, सरपंच, शासकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. या कार्यशाळेचे राजापूर पोलीस प्रशासनाच्यावतीने नियोजन करण्यात आले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 10/Feb/2025














