चिपळूण : शहरातील प्रभात रोड मार्गावरील रस्त्याची अखेर पालिकेने दुरुस्ती केली. त्यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मार्कंडी भागातील प्रभात रोड आणि नारायण तलाव परिसरातील रस्त्यावर गेली अनेक दिवस खड्डे पडले होते. या खड्ड्यातून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. धुळीमुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले होते. यासंदर्भात प्रभात रोड फाउंडेशनने आवाज उठविला. पालिकेवर धडक देऊन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी रस्त्याची तत्काळ दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासनही दिले होते. त्यानुसार रस्त्याची तत्काळ दुरुस्ती सुरू करण्यात आली.
वन विभागाच्या कार्यालयासमोरचा रस्ता तसेच नारायण तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नारायण तलाव परिसरात सकाळी चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचीही गैरसोय दूर झाली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, नगर अभियंता दीपक निंबाळकर यांनी हे काम पूर्ण करून दिल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभारही मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 10/Feb/2025














