मंडणगड : तालुक्यातील कुंभार्ली गावात जलजीवन मिशन अंर्तगत हाती घेण्यात आलेली घर घर नळपाणी पुरवठा योजनेची विहिरीचे पाणी दूषित व दुर्गंधीयुक्त असल्याने योजना कार्यान्वित करण्यास ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवला. योजना सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करणारी नवीन विहीर देण्याची मागणी केली आहे. गावातील योजना भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेली असल्याची ग्रामस्थांना शंका असल्याने या संदर्भात योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या विषयासंदर्भात ग्रामस्थ राकेश म्हाप्रळकर, संतोष कलमकर, अशोक चिपळूणकर, सचिन संवादकर, चंद्रकांत केळसकर, मारुती महाप्रळकर, आनंद कलमकर, दिनेश चिपळूणकर, कृष्णा केळसकर, सीताराम लेंगे यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, अभियंता व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीनिशी वर्कऑर्डर आदेश १ फेब्रुवारी २०२३ नुसार हे काम उपअभियंता स्थानिय पाणीपुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात आले होते. योजनेची अंमलबजावणी करताना स्थानिक अधिकारी व ठेकेदार यांच्यातील संगनमत व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यास भाग पाडले जात आहे. याला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. ६ फेब्रुवारीला झालेल्या लोकात्रण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत उपअभियंता अधिकारी यांना ग्रामस्थांनी प्रश्न विचारले.
पाण्याची गुणवत्ता तपासणी करणाऱ्या एकाच प्रयोगशाळेतून तपासणीचे दोन भिन्न अहवाल कसे दिले गेले, पहिला अहवाल पाणी पिण्यास योग्य व एक महिन्यात दुसरा अहवाल पाणी पिण्यास अयोग्य कसा येऊ शकतो. त्यामुळे विहीर खोदणी करताना पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत का पाठवले गेले नाहीत? जलवापराच्या गुणवत्ता व क्षमतेची चाचणी केली होती का योजनेच्या अंमलबजावणीकडे यंत्रणेने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले असून, भ्रष्टाचाराची मुळे खोलवर पसरली आहेत. त्यामुळे याची उच्चस्तरीय अधिकारी नेमून सखोल चौकशी करून अधिकारी व ठेकेदार यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुंभाली ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, तरुण उत्साही मंडळ मुंबई यांच्यावतीने ग्रामस्थांनी केली आहे. गावाला शुद्ध पाणी पिण्यास उपलब्ध करून द्यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
कारवाई करून पुढचा निर्णय होईल
या संदर्भात पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता जवादे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, यंत्रणेकडून सदर विहिरीचे पाण्याची गुणवत्ता नव्याने तपासण्यात येणार असल्याचे सांगितले. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर या संदर्भातील पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.
पाण्याचा रंग व वास पाहता अहवाल पिण्यायोग्य आल्याने शंका निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी अन्य दोन ठिकाणी पाणीनमुने तपासले असता ते दूषित व पिण्याअयोग्य आढळून आले आहेत. सचिन संवादकर, ग्रामस्थ
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 14/Feb/2025














