ताडोबातील २ वाघ येणार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात

चिपळूण : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील २ वाघ सह्याद्रीत आणले जाणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. ताडोबातील वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आल्यानंतर येथील वाघांची संख्या वाढणार आहे. वाघांच्या सुरक्षेसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स स्थापन करण्याची मागणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून केंद्र सरकारला करण्यात आली आहे.

राज्यात व भारतातील सर्व व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संवर्धन दल कार्यरत आहे. सह्याद्री प्रकल्पासाठी या दलाची तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थापना करण्यासाठी प्रस्तावित केले होते. या दलास केंद्राकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. भविष्यात होणाऱ्या व्याघ्र पुनर्वसनाच्या दृष्टीने हे दल असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोयना व चांदोली अभयारण्यातील ६९०.६३ चौरस किलोमीटर क्षेत्र शासनाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले आहे. केंद्रीय व्याघ्र संवर्धन समितीने वाघांच्या पुनर्वसनाला तत्त्वतः मंजुरी दिल्यामुळे ताडोबा प्रकल्पातील आठ वाघ सह्याद्रीत आणले जाणार आहेत.

यातील चार वाघ चांदोली, तर चार वाघ कोयना प्रकल्प क्षेत्रात सोडण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात दोन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्याची तयारी सुरू झाली आहे. केंद्राच्या व्याघ्र संवर्धन समितीने वाघांच्या पुनर्वसनाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे ताडोबातील वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मात्र, या वाघांच्या
सुरक्षेसाठी असणारा स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स येथे आवश्यक आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकल्प क्षेत्रातील वाघांची संख्या लक्षात घेऊन सह्याद्री व मेळघाट येथे एकाचवेळी हा फोर्स मंजूर केला आहे. यात १२० प्रशिक्षित वन कर्मचारी, तसेच अधिकारी असतात.

सह्याद्री व मेळघाट येथे एकाचवेळी हा फोर्स मंजूर केला आहे. मेळघाटवर हा कार्यरत झाला आहे. मात्र, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हा फोर्स अजून नाही. चांदोलीत वाघ आणायचा, तर चितळांची संख्या पुरेशी हवी म्हणून शासनाने सागरेश्वर, कात्रज आणि सोलापूर येथून चितळ आणून चांदोलीत सोडण्याची परवानगी दिली आहे.

Tata safari

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील ८ वाघ सह्याद्रीत आणले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात दोन वाघ आणण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. केंद्राकडून त्याला मंजुरी मिळाली, तर ही प्रक्रिया सुरू होईल. सह्याद्रीत वाघांची संख्या वाढली, तर टायगर प्रोटेक्शन फोर्सची गरज निर्माण होईल. त्याचाही प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे- किरण जगताप, उप वन संरक्षक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:47 PM 14/Feb/2025