रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भूगोल विभागाच्या वतीने ३० जानेवारी रोजी आंतर महाविद्यालयीन सागर महोत्सव स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत एकूण ९ वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या ७३ विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या स्पर्धांसाठी आसमंत फाऊंडेशन व मुकुल माधव फाऊंडेशन यांनी प्रायोजकत्व केले. सागर महोत्सव दरवर्षी आसमंत फाऊंडेशन यांच्या वतीने रत्नागिरीत आयोजित केला जातो. याच पार्श्वभूमीवर सागर हा मुख्य विषय घेऊन वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी स्पर्धांचे आयोजन केले जाते. सागराविषयीचा अभ्यास, त्यातील जैवविविधतेचे महत्व व समस्यांविषयी जाणीव जागृतीसाठी या स्पर्धा घेतल्या जातात.
यात फोटोग्राफी, व्हिडीओ लॉग आणि सागर प्रज्ञा परीक्षा या तीन प्रकारांत स्पर्धा घेतल्या गेल्या. या स्पर्धांमध्ये तीनही स्पर्धेसाठी पारितोषिक प्रथम क्रमांक सुवर्णपदक, प्रमाणपत्र व रुपये १००० रोख; द्वितीय क्रमांक- रौप्य पदक, प्रमाणपत्र व रुपये ७०० रोख; तृतीय क्रमांक- कांस्य पदक, प्रमाणपत्र व रुपये ५०० रोख, तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक प्रमाणपत्र व रुपये २०० रोख अशी बक्षिसे देण्यात आली.
सागर महोत्सव स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले, तसेच बक्षीस वितरण समारंभ कला शाखा उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यात फोटोग्राफी प्रथम क्रमांक- श्रीराम भागवत, डी. बी. जे. महाविद्यालय चिपळूण; द्वितीय क्रमांक यश मयेकर, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय रत्नागिरी, तृतीय क्रमांक -फिजा खान, डी. बी. जे. महाविद्यालय चिपळूण; उत्तेजनार्थ दुर्वा नागवेकर, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी; व्हिडीओ लॉग स्पर्धेत प्रथम क्रमांक – नम्रता नलावडे आणि अनिकेत मते, आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय देवरुख; उत्तेजनार्थ पारितोषिक सलोनी घडशी, डी. बी. जे. महाविद्यालय चिपळूण आणि सागर प्रज्ञा परीक्षा प्रथम क्रमांक सिद्धी गवळी, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय; द्वितीय क्रमांक अमेय लोहार, रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड; तृतीय क्रमांक चैतन्य पटवर्धन, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, उत्तेजनार्थ तैबा गडकरी, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी यांनी यश संपादन केले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागासाठीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य आणि भूगोल विभाग प्रमुख डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, तसेच प्रा. विनायक गावडे, प्रा. श्रावणी विभूते आणि प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 15/Feb/2025














