दुबई : आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आयोजन होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या एकूण बक्षीस रकमेत तब्बल ५३ टक्क्यांनी भरघोस वाढ करण्यात आली आहे. तसेच स्पर्धेत एकूण ६० लाख ९० हजार डॉलरचा (सुमारे ६० कोटी रुपये) वर्षाव होईल.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला २२ लाख ४० हजार डॉलरचे (जवळपास २० कोटी रुपये) बक्षीस मिळणार आहे. तसेच उपविजेता संघही ११ लाख २० हजार डॉलरची (जवळपास ९.७२ कोटी रुपये) कमाई करेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शुक्रवारी स्पर्धेतील बक्षीस रकमेची माहिती दिली. वर्ष १९९६ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये आयसीसी स्पर्धा रंगणार आहे.
स्पर्धेच्या बक्षीस रकमेत मोठी वाढ करण्यात आली असून, ही गुंतवणूक आमच्या स्पर्धेची जागतिक प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ क्रिकेटसाठी खूप महत्त्वाची स्पर्धा आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गुणवत्तेचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचे पुनरागमन होत असून, प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. – जय शाह, अध्यक्ष, आयसीसी
२० फेब्रुवारीला मोहीम सुरू
भारतीय संघ स्पर्धेतील आपला पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळेल. स्पर्धेतील आठ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
पुरुष क्रिकेटपटूंची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा वर्ष १९९८ पासून सुरू झाल्यानंतर दर दोन वर्षांनी रंगणारी ही स्पर्धा २००९ ते २०१७ दरम्यान दर चार वर्षांनी रंगली. कोरोना महामारीनंतर ही स्पर्धा थेट आता होणार आहे. तसेच महिलांची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०२७ पासून रंगणार असल्याची माहिती ‘आयसीसी’ने दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:51 15-02-2025
