लांजा : गोळवशी शाळा भरतेय एका घरात

लांजा : छप्पर दुरुस्तीच्या कामामुळे गेली वर्षभरापासून एका घरात शाळा भरण्याची नामुष्की लांजा तालुका शिक्षण विभागावर आली आहे. जिल्हा परिषदेची गोळवशी शाळा क्र. २ ही शाळा आजही घरात भरत आहे. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ विभागाकडून शाळेच्या दुरुस्तीसाठी अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवर ही वेळ आली आहे.

छप्पर दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांनी मार्च २०२४ मध्ये श्रमदान करून छपरावरील कौले, वासे व अन्य साहित्य बाजूला काढून ठेवले होते. जेणेकरून काम लवकर लवकर पूर्ण होईल आणि नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थी शाळेत बसू शकतील, अशी पालकांची अपेक्षा होती. तसे आश्वासन देखील छप्पर दुरुस्त करणाऱ्या ठेकेदाराने ग्रामस्थांना दिले होते. मात्र त्यानंतर प्रत्यक्षात शाळा सुरू होऊन पंधरा दिवस होऊन गेले, तरीही ठेकेदारांकडून शाळेचे छप्पर दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही.

शाळा इमारतीवर छप्पर नसल्याने नाईलाजाने शाळा एका ग्रामस्थांच्या घरात भरविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेऐवजी गावतील एका घरात बसून शिक्षण घेत आहेत. प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

याबाबत ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य गणेश खानविलकर यांनी पंचायत समिती शिक्षण विभाग, गटशिक्षणाधिकारी यांना देखील भेट घेऊन निवेदन दिले होते. लांजा गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर जि.प. शिक्षण विभागाकडे सादर केला आहे. मात्र, त्यांच्याकडून शाळा दुरूस्ती किंवा नवीन इमारत बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने सलग दुसऱ्या वर्षीही विद्यार्थ्यांवर घरात बसून अध्यापन करण्याची नामुष्की आली आहे.

Tata sierra

६० हजारांचा निधी मंजूर
निधी उपलब्ध नसल्याने किमान या शाळेचे छप्पर तरी बांधून द्यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य गणेश खानविलकर यांनी गतवर्षी म्हणजे २०२४ मध्ये केली होती. त्यानंतर या शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी सुमारे ६० हजार रुपयांचा निधी मंजूरही झाला होता. मात्र तरीही काम रखडले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 17/Feb/2025