IND vs BAN, Champions Trophy: कॅप्टन रोहित शर्मानं सोपा कॅच सोडला अन् अक्षर पटेलची हॅटट्रिक हुकली..

IND vs BAN Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या लढतीत भारतीय संघातील गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांना खिंडीत पकडल्याचा सीन पाहायला मिळाला. दुबईच्या मैदानात रंगलेल्या लढतीत पहिल्या टप्प्यात मोहम्मद शमी आणि हर्षित राणा यांनी बांगलादेशच्या संघाला धक्क्यावर धक्के दिले.

या जोडीच्या चार-चार षटकांच्या स्पेलनंतर अक्षर पटेल गोलंदाजीला आला. ऑलराउंडर फिरकीपटूनं आपल्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव टाकल्यावर दोन चेंडूवर दोघांना तंबूचा रस्ता दाखवला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत हॅटट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज होण्याची संधी त्याच्याकडे चालून आली. सर्वोत्तम चेंडू टाकून त्याने त्याच्या बाजूनं प्रयत्नही केला. पण भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं स्लिपमध्ये कॅच सोडला अन् अक्षर पटेलची हॅटट्रिक हुकली.

रोहितन कॅच सोडला अन् अक्षरची हॅटट्रिक हुकली

बांगलादेशच्या डावातील ९ व्या षटकात अक्षर पटेल गोलंदाजीला आला. तांझिद हसन याला पहिला चेंडू निर्धाव टाकल्यावर दुसऱ्या चेंडूवर अक्षरनं त्याची विकेट घेतली. विकेटमागे लोकेश राहुलनं त्याचा कॅच पकडला. तो २५ चेंडूत २५ धावा करून परतला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या मुशफिकर रहिमला अक्षरनं आल्या पावली माघारी धाडले. त्याचा कॅचही यष्टीरक्षक लोकेश राहुलनंच टिपला. हॅटट्रिक टेंडूवर टीम इंडियातील बापूनं जाकेर अलीलाही फसवलं. चेंडू बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये गेला. पण तिथ रोहित गडबडला. त्याने एक सोपा झेल सोडला अन् अक्षर पटेलची हॅटट्रिकची संधी हुकली.

रोहितनं कॅच सोडल्यावर जमिनीवर हात आपटून व्यक्त केली नाराजी, अक्षरचीही मागितली माफी, पण…

कॅच सुटल्यावर रोहित शर्मानं जमिनीनर हात आपटून नाराजी व्यक्त केली. एवढेच नाही त्याने अक्षर पटेलची माफीही मागितली. पण जे घडलं ते बदलण्याजोग नव्हते. जर रोहित शर्मानं हा कॅच पकडला असता तर अक्षर पटेल चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत हॅटट्रिक घेणारा भारताचा पहिला आणि आतापर्यंतच्या इतिहासातील दुसरा गोलंदाज ठरला असता. या स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाच्या नावे हॅटट्रिकची नोंद आहे. २००६ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जेरोम टेलरनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध हॅटट्रिकचा डाव साधला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:21 20-02-2025