मोडकाआगार : गुहागर पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, गुहागर बीट चिखली १ व २ यांच्या वतीने बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ अभियानांतर्गत विशेष उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ग्रामपंचायत पाटपन्हाळे (श्रृंगारतळी) हॉल येथे पार पडले. या कार्यक्रमासाठी गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी प्रमोद केळसकर, चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकला वाडकर, पाटपन्हाळे ग्रामपंचायत सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असीम साल्हे, वरवेली ग्रामपंचायत सरपंच नारायण आगरे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तेलगडे, पत्रकार गणेश किर्वे, पर्यवेक्षिका चैताली हळये व सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस व पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. अंगणवाडी सेविका यांच्या सुस्वर गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडी गीत याचे सामूहिक गायन केले.
अंगणवाडीतील मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या विशेष सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकला वाडकर व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी किशोरवयीन मुलीची हिमोग्लोबिन तपासणी केली. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांची सुद्धा आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमातून आरोग्य जागरूकता आणि सशक्तिकरणासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले गेले. अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या सादरीकरणाचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे व एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रमोद केळसकर व इतर मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
यावेळी बोलताना गट विकास अधिकारी शेखर भिलारे यांनी सांगितले की, अंगणवाडीतील विद्यार्थी हे आपले भविष्य असून या विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम आपण प्रामाणिकपणे करत आहात परंतु या मुलांना घडविण्यास आपण कमी पडलो तर आपले उद्याचे भविष्य धोक्याचे असणार आहे हे विसरता कामा नये. आपली मुले जगाच्या स्पर्धेत कुठेच कमी पडता कामा नये, यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून शासनाच्या विविध उपक्रमाची जनजागृती केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 21/Feb/2025
