मंत्री उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी

मुंबई – आज शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, पुण्यात मराठी भाषिकांच्या संमेलनाला उपस्थित राहण्याची विनंती मी राज ठाकरेंना केली होती. त्या विनंतीला मान देऊन त्यांनी संमेलनाला हजेरी लावली. त्याबद्दल आज त्यांचे आभार मानण्यासाठी मी भेट घेतली. मराठी भाषेबाबत आमच्यात चर्चा झाली. दिल्लीत मराठी साहित्य संमेलन सुरू आहे त्याबद्दल चर्चा झाली. राजकीय चर्चा झाली नाही. या भेटीला राजकीय स्पर्श करू नये. ही अतिशय साधी आणि सहज भेट होती. आमची राजकीय भेट नव्हती असं त्यांनी सांगितले.

तसेच राज ठाकरे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यासोबत राजकारणापलीकडे जाऊन गप्पा मारल्या तरी आपल्या ज्ञानात भर पडते. त्यामुळे ही भेट राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. विश्व मराठी संमेलनाला राज ठाकरे उपस्थित होते, त्यांचे आभार मानण्यासाठी ही भेट होती. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्रित युतीमध्ये येणार का हे माझ्यासाठी फार मोठा विषय आहे. एवढ्या पातळीवरील चर्चेत मी कधी पडलो नाही. माझ्या आवाक्यातील आणि झेपतील असे प्रश्न असतील तर मी त्याला उत्तर देऊ शकतो असा चिमटा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना काढला.

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येणार असतील तर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली पाहिजे. आजची चर्चा राजकारणविरहित होती. राज ठाकरेंच्या भाषणाची शैली आणि त्यांचे वकृत्व वेगळे आहे. त्यांच्यासोबत बोलल्यानंतर भविष्यात आपल्यातही सुधारणा होऊ शकते त्यादृष्टीने भेटीकडे पाहावे. मराठी उद्योजकांवर, मराठी भाषिकांवर अन्याय होऊ नये यासाठी मराठी भाषा विभागाचा मंत्री म्हणून मी पुढाकार घेतला पाहिजे हे मार्गदर्शन त्यांनी केले. मराठी भाषेसाठी, साहित्यासाठी, कलाकारांसाठी काय केले पाहिजे यावर चर्चा झाली. गप्पांच्या माध्यमातून चर्चा झाली असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 22-02-2025