राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता

पुणे : सध्या फेब्रुवारी महिन्यामध्ये चांगलीच उष्णता वाढली आहे. राज्यामध्ये किमान आणि कमाल तापमानात खूप मोठी तफावत पाहायला मिळत आहे. राज्यात शुक्रवारी (दि.२१) सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरीत ३८.६, तर सर्वांत कमी किमान तापमान जळगावात १२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

राज्यातील तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने केला आहे.

राज्यात फेब्रुवारी महिन्यामधील उष्णता अतिशय असह्य होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले की, महाराष्ट्रावर वारा-वहनाच्या पॅटर्नमध्ये काहीही बदल झालेला नाही. तो आहे तसाच टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर हवेच्या उच्च दाबातून, प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे उत्तरेतील थंड वाऱ्यांना भिंतीसारखा अटकाव तयार झाला. पर्यायाने उत्तरेतील थंड वारे महाराष्ट्रात पोहोचलेच नाही. त्यामुळे काहीसे निरभ्र आकाश असूनही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून विशेष अशी थंडी आतापर्यंत महाराष्ट्रात जाणवत नाही.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हवेच्या दाबात आणि वारा वहन प्रणालीत जर काही बदल झाला, तरच किमान तापमानाचा पारा खालावून थंडी पडू शकते. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, उत्तर पुणे, उत्तर नगर, व उत्तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान पहाटे काहीसा गारवा जाणवण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे खुळे म्हणाले.

तसेच बंगालच्या खाडीतील सध्याच्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे केवळ फक्त विदर्भातच शनिवारी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी नगण्य पावसाची शक्यता असल्याचे खुळे यांनी सांगितले.

कमाल व किमान तापमान

पुणे : ३५.२ : १४.९
नगर : ३४.२ : १८.३
जळगाव : ३४.४ : १२.०

महाबळेश्वर : ३१.० :१७.४
रत्नागिरी : ३८.६ : २१.५

मुंबई : ३४.३ : २२.४

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 22-02-2025