संगमेश्वर : छत्रपती शिवाजी महाराजांनी शृंगारपूरवर केलेल्या स्वारीची माहिती देणारा मोडी लिपीतील ऐतिहासिक मोडी कागद उजेडात आला आहे. मिरज येथील मोडी अभ्यासक स्वरा मराठे यांनी याबाबत संशोधन केले आहे. त्यातून या स्वारीसंबंधी नवी माहिती प्रकाशात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सन १६६१ मध्ये कोकणात मोहीम केली. रत्नागिरीजवळ संगमेश्वरलगत असणाऱ्या शृंगारपूरच्या सुर्वे यांनी आदिलशहाच्या हुकूमानुसार महाराजांसोबत अकारण वैर धरले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६५ मध्ये तळकोकण मोहिमेत राजापूर घेतल्यानंतर आपला मोर्चा शृंगारपूरकडे वळवला. तिथे सूर्यराव सुर्वे शेजारील स्वराज्याच्या मुलखात पुंडावा करत उपद्रव करत. उपद्रव नाहीसा करण्यासाठी शिवरायांनी शृंगारपूरवर अचानक छापा टाकला; पण त्याआधीच सूर्यराव सुर्वे पळून गेला. त्याचे सैनिक शरण आले आणि मराठ्यांनी शृंगारपूर जिंकत त्या भागात असलेला प्रचितगडदेखील स्वराज्यात दाखल केला, अशी माहिती मोडी अभ्यासातून पुढे आली आहे. या स्वारीची थोडीच माहिती उपलब्ध झालेली होती. मोडी अभ्यासक मराठे यांना झालेल्या पत्रांवरून स्वरा मराठे उपलब्ध या स्वारीची आणखी माहिती मिळणार आहे.
मराठे यांना उपलब्ध झालेले पत्र म्हणजे संगमेश्वरजवळील मौजे तिवरे येथील खोतीच्या वादासंदर्भातील पत्र आहे. सन १८०२ मधील ते पत्र आहे. खोतीच्या हक्कासंदर्भातील वादामध्ये खोत आणि सावंत यांनी आपली बाजू मांडली होती. त्यात या परिसराचा पूर्वइतिहास कथन केलेला आहे खोती हक्काची बाजू मांडताना पूर्व हकिकतीमध्ये सावंत याच्या मुलाने लहान असताना शिवाजी महाराजांनी शृंगारपूरवर स्वारी केली शृंगारपूरचा राजा पळून गेला आणि सावंत, पवार परागंदा झाले. शिवाजी राजांनी किल्ला बांधला. गावात गडकरी यांनी शेते पेरली, असा उल्लेख आहे. यानंतर सावंत गावी पुन्हा नांदू लागले. शिवाजी महाराजांच्या या स्वारीमुळे या भागात काय झाले, याची माहिती या मोडीपत्रात आलेली आहे.
स्वरा मराठेंचा विशेष अभ्यास
मोडी अभ्यासक स्वरा मराठे या गेली ६ वर्षे मोडीतज्ञ मानसिंगराव कुमठेकर यांच्यासोबत मोडी लिपीतील कागदासंबंधी अभ्यास करत आहेत. त्यांनी विविध प्रकारची ऐतिहासिक कागदपत्रे वाचलेली आहेत. शासनाच्या कुणबी शोधमोहिमेत त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली असून, त्यांना मिळालेल्या संगमेश्वरच्या कागदांमुळे शिवरायांच्या शृंगारपूर स्वारीची नव्याने माहिती मिळाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 22/Feb/2025
