Ratnagiri, Rice Crop| पावसामुळे भात कापणीचा हंगाम लांबण्याची शक्यता

रत्नागिरी : तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शहर आणि तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भात कापणी Rice Crop लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पाणथळ जागेतील खाचरात पाणी वाढल्याने लोंबीला आलेली भाताची रोपे आडवी होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

तयार होत आलेल्या भातपिकाला Rice Crop पाण्याची फारशी गरज नसते. अशा परिस्थितीत शेतात पाणी भरल्‍याने भातकापणी लांबण्याची तसेच कीडरोग प्रादुर्भावाची शक्‍यता आहे. यावर्षी सुरवातीपासून समाधानकारक पडलेल्या पावसाने भातशेती चांगलीच तरारली आहे; मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

घाटमाथ्यावर झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे येथील नद्यांच्या पात्रातही मोठी वाढ झाली आहे. भातशेतीत पाणी साचल्‍याने हातातोंडाशी आलेले भातपिक वाया जाण्याची भीती आहे. दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांकडून भातपिक कापण्याची तयारी सुरू आहे. यासाठी कापणीच्या साहित्याची जुळवाजुळव सुरू आहे. दोन ते तीन आठवड्यांत भातकापणी सुरू होणार होती; परंतु पावसाने कापणीचे नियोजन बिघडले आहे.

परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला तर शेतकऱ्यांवर संकट ओढावण्याची शक्‍यता आहे. कापणीच्यावेळी शेतात पाणी राहिल्‍यास कापलेला कडपा व्यवस्थित ठेवता येत नाही. कापलेल्या भाताच्या लोंब्या पाण्यात भिजल्याने दाणा खराब होतो त्याचबरोबर चिखलातून भातकापणी करण्यासाठी जादा मनुष्यबळाची गरज भासते. अशा अनेक समस्‍यांमुळे शेतीचे अर्थकारण बिघडण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

कापणीदरम्यान खाचरामध्ये पाणी कमीत कमी असावे लागते. त्यामुळे कापलेला भात Rice Crop व्यवस्थित वाळत ठेवता येतो; परंतु पाणी जास्त असल्यास भात वाळत ठेवता येत नाही. मनुष्यबळ जास्त लागते. वाढत्या महागाईत मजुरी परवडत नाही. – गणेश शिंदे, शेतकरी, शिरगाव

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:50 03-10-2024