वैदिक गणिताचा प्रचार प्रसार करणे हेच माझे ध्येय : डॉ. राजीव सप्रे

रत्नागिरी : गणित हा अधिक संशोधन झालेला विषय आहे. जगाच्या पाठीवर भारताचे गणित हे आदर्शवत आहे. याच परंपरेतील वैदिक गणिताचा प्रचार प्रसार करणे हेच माझे ध्येय असल्याचे प्रतिपादन गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील गणित विभागाचे निवृत विभागप्रमुख डॉ. प्रा. राजीव सप्रे यांनी केले.

केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या आर्थिक सहयोगाने, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र, वेदांग ज्योतिष विभाग, रामटेक आणि गोगटे महाविद्यालयाचा संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय भारतीय गणित कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर म्हणाले की, आपल्या भारतीय गणिताचा प्रभाव हा जगातील सर्व गणितावर आहे. याच प्राचीन परंपरेने दशमान पद्धत, बीजगणित, शून्याचा शोध हे आविष्कार जे देऊ केले ते आज प्रचलित आहे. त्यामुळे हा वारसा जपण्याचे कर्तव्य प्रत्येकाचे आहे.

संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी भारतीय गणित आणि गणिताची कालपरत्वे असणारी उपयोगिता व कार्यशाळेच्या आगामी रूपरेषेबाबत प्रास्ताविकात भाष्य केले. कार्यक्रमाला मंचावर संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये उपस्थित होत्या. तसेच कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, रत्नागिरी व रत्नागिरीच्या आजूबाजूच्या परिसरातून विद्यार्थी, स्थानिक रत्नागिरीकर उपस्थित होते.

दि. २५ रोजीची व्याख्याने
सकाळी ११ ते १२.३०- द भास्कराचार्य क्लासरूम अन्वेष देवुलपल्लि, दुपारी १२.३० ते १.३०- भारतीय गणिताचा इतिहास आणि व्यापकता- डॉ. कृष्णकुमार पांडेय, २.३० ते ३.३०- भारतीय अंक गणित व्यवस्थापन- डॉ. रामकृष्ण पेजात्ताय, दुपारी ३.३० ते ४.३०- लिलावती व बिजगणितातील गमतीजमती डॉ. रामकृष्ण पेजात्ताय.

वैदिक गणिताचे गिरवले धडे
डॉ. प्रा. राजीव सप्रे यांनी वैदिक गणिताचा उगम व त्याची उपयोगिता याबाबत भाष्य केले. त्यांनी उपस्थित विद्यार्थी, रत्नागिरीकर यांना गणिताच्या वेगवेगळ्या प्रश्नाची उत्तरे वैदिक गणितातून कशा रीतीने सोडवता येतील याचे प्रात्यक्षिक दाखवले. सहभागी झालेल्या सर्वांकडून त्यांनी वैदिक गणितातील निवडक सूत्रांच्या आधारे विविध प्रात्यक्षिके करवून घेतली. त्यामुळे रत्नागिरीकरांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून वैदिक गणिताचे धडे गिरवले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 PM 25/Feb/2025