मुंबई-गोवा महामार्गाला वृक्षलागवडीची प्रतीक्षा…

राजापूर : फेब्रुवारी संपून मार्च सुरू होत असतानाच वाढत्या उष्ण तापमानाच्या झळा अधिक तीव्र होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आत्ता ही अवस्था तर मग पुढे एप्रिल आणि मे मध्ये काय होईल अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांच्या तोंडून उमटत आहेत. त्यातच सुखकर प्रवासासाठी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी महामार्गावरिल अनेक जुनी झाडे तोडण्यात आल्याने महामार्ग सध्या उजाड झाला आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही सावलीचा शोध घ्यावा लागत आहे.

त्यातच महामार्गावर वृक्ष लागवड करणे आवश्यक असताना व तसे धोरण निश्चित असताना जसा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा वेग मंदावलेला आहे तसाच वृक्ष लागवडीचाही वेग संथ आहे. जिल्हयात आजपर्यंत महामार्गावर विविध टप्प्यांतील भागात केवळ १४ टक्केच ठिकाणी वृक्ष लागवड झालेली आहे. तर काही ठिकाणी पाण्याअभावी लावलेली झाडे सुकून गेली आहेत.

त्यामुळे आता भविष्यात या महामार्ग चौपदरीकरणाचे जसे टप्पे पुर्ण होतील त्या त्या भागात १०० टक्के वृक्ष लागवड करून त्याच्या योग्य संगोपनाची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर निश्चित करणे आवश्यक आहे. तरच भविष्यात हा मुंबई गोवा महामार्ग पुर्वीप्रमाणे आजुबाजुला झाडा झुडपांनी बहरलेला दिसेल.

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. काही ठिकाणी काम पुर्णही झाले आ आहे. मात्र या चौपदरीकरणाच्या कामात रस्त्याच्या दुतर्फा वर्षानुवर्षे उभी असलेली भलीमोठी झाडे तोडल्यामुळे सध्या रखरखत्या उन्हात प्रवाशांना व वाहन चालकांना महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. हे काम करताना तोडलेले वृक्ष पुन्हा महामार्गाच्या बाजूला लावण्याचे शासनाचे धोरण आहे. तर रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकाच्या जागेतही झाडे लावली जाणार आहेत. मात्र सध्या हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. जिल्ह्यात चौपदरीकरणात रस्त्याच्या मध्यभागी आणि दुतर्फा अशी वृक्ष लागवड करण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. त्यात परशुराम ते आरवली, आरवली ते कांटे, कांटे ते वाकेड आणि वाकेड ते तळगाव अशा टप्यामध्ये सावर्जनिक बांधकाम विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागांनी लागवड केली आहे.

त्यामध्ये दुतर्फा ८८ हजार ८१ आणि मध्यभागी ११ हजार ३५२ असे ९९ हजार ४३३ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी दुतर्फा ४ हजार २२४ आणि मध्यभागी ४ हजार ९६७ अशी एकूण ९ हजार १९१ वृक्षलागवड झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात ९९ हजार ४३३ रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट असून, त्यापैकी केवळ ९ हजार १९१ रोपांची लागवड झाली आहे. सरासरी १४.२ टक्के कार्यवाही झालेली आहे. त्यामुळे महामार्गावर ही १०० टक्के वृक्ष लागवड होऊन हा महामार्ग हरित कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गेल्या काही दिवसात तापमान वाढले असून, रत्नागिरी जिल्ह्यात तापमान ३६-३७ अंश राहिले आहे. महामार्गावर झाडांची सावली नसल्यामुळे रखरखत्या उन्हाचे चटके सहन करत वाहनचालकांसह प्रवाशांना मार्गस्थ व्हावे लागते. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला सावलीत विश्रांती घेण्यासाठी दुचाकीचालकांना थांबताही येत नाही. रणरणत्या उन्हाच्या चटक्यांमुळे त्रस्त प्रवासी कोणी सावली देता का सावली? असे म्हणत आहेत.

महामार्गावर आरवली ते कांटे आणि वाकेट ते तळगाव या भागात दुभाजकांमध्ये झाडांची लागवड केलेली नाही. जिथे झाडे लावली आहेत त्यांना दररोज किंवा एक दिवसाआड पाणी दिले जात होते. त्यामुळे रखरखत्या उन्हात ही झाडे काही प्रमणात जिवंत होती. सध्या या झाडांना पुरेसे पाणी दिले जात नसल्यामुळे ती सुकून गेली आहेत. त्यामुळे ज्या उद्देशाने ही झाडे लावण्यात आली तो उद्देश सफल झालेला नाही.

तर महामार्गावर अशा प्रकारे भविष्यात वृक्ष लागवड झाल्यास प्रवाशांना व वाहन चालकांना दिलासा मिळणार असून कोकणच्या निसर्ग सौंदर्यात भर पडणार आहे. त्यामुळे ज्या वेगाने झाडे तोडली किमान त्या वेगाने आता तरी या पावसाळयात महामार्गावर दुतर्फा वृक्ष लागवड करावी अशी मागणी होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर सावर्जनिक बांधकाम विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाकडून वृक्षलागवड सुरू आहे. काही झाडे सुकली आहेत ही वस्तुस्थिती असली तरीही तिथे नव्याने पुन्हा लागवड करण्यात येणार आहे. त्याची कायर्वाही सुरू आहे. रस्त्याच्या मध्यभागी आणि दुतर्फा लागवड केलेल्या झाडांना पाणी देणे आणि त्यांचे संगोपन करणे ही जबाबदारी ठेकेदाराची आहे. त्यांना सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम महामार्ग विभागाचे उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी यांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:13 PM 01/Mar/2025