राजापूर : खरवते ग्रामपंचायतीत वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणपूरक कार्यक्रम

राजापूर : तालुक्यातील खरवते ग्रामपंचायतीतर्फे उत्कर्ष विद्यामंदिरमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणपूरक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिकचा वापर न करता पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करा, असे आवाहन करण्यात आले.

खरवते प्रशालेमध्ये घेण्यात आलेल्या विज्ञान प्रश्नमंजूषा, निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांसमवेत विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल विज्ञान शिक्षक सुभाष सोकासणे आणि विज्ञान विषयातील ‘विज्ञानरंजन’ व ‘रोल्स’ या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये विजेती विद्यार्थिनी आकांक्षा चौगुले हिचा सत्कार करण्यात आला.

उत्कर्ष विद्यामंदिर, खरवते येथे झालेल्या कार्यक्रमावेळी सरपंच अभय चौगुले, उपसरपंच गौरव सोरप, ग्रामपंचायत सदस्य जान्हवी माटल, किशोर शिक्षक सुभाष सोकासणे यांनी, विज्ञान या विषयाकडे डोळसपणे पाहा व त्याचा अभ्यास करा, असे आवाहन केले. ग्रामपंचायत अधिकारी नेहा कुडाळी यांनी भारतीय संस्कृती ही विज्ञानाशी निगडित असून तिचे अनुकरण करा, असे आवाहन केले. कचरा व्यवस्थापनासाठी शाळेला ग्रामपंचायतीमार्फत कचराकुंडी देण्यात आली. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कापडी पिशवी देऊन प्लास्टिक बंदीविषयी जागृती केली.

वसुंधरा अभियानाची घेतली शपथ
माझी वसुंधरा अभियानांतर्गत प्लास्टिक बंदी व पर्यायी वापराबाबत जागृती, शाश्वत शेती, फटाके बंदी, वातावरणीय बदल, ई-कचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर, बांबू, शेवगा, नाचणी लागवड, सौरऊर्जेचा वापर आदी विषयांवर पर्यावरणदूत व शिक्षकांमार्फत जनजागृती करण्यात आली. यावेळी सर्वांनी माझी वसुंधरा अभियानाची शपथही घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 03/Mar/2025