रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांनी मार्चअखेरचा अतिरिक्त ताणतणाव न घेता तो महोत्सव कसा होईल, हे पाहावे. ३१ मार्च हा आपल्या उद्दिष्टपूर्तीच्या माध्यमातून एक शानदार महोत्सव म्हणून प्रत्येक संस्थेने साजरा करावा, असे आवाहन राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष तथा स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने सहकार खाते रत्नागिरी व जिल्हा पतसंस्था फेडरेशनतर्फे स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने सहभागी सर्व ११४ संस्था प्रतिनिधींना स्मृतिचिन्ह देण्यात आले. या पतसंस्थांचे २५२ प्रतिनिधी सहभागी झाले. जिल्हा विशेष लेखा परीक्षक प्रकाश मांडरे, तज्ज्ञ संचालक मुग्धा करंबेळकर, सहाय्यक निबंधक साहेबराव पाटील, संतोष थेराडे आदी प्रमुख उपस्थित होते. या कार्यशाळा आयोजनासाठी स्वामी स्वरूपानंद पतसंस्था, मुरली मनोहर पतसंस्था, शिववैभव पतसंस्था यांचे सहकार्य लाभले होते. वसुली यंत्रणा कशी सजग ठेवली पाहिजे. तरतुदींच्या स्वतंत्र गुंतवणुका, घसारा, आकारणी, देय व्याजाचे हिशेब, गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाचा हिशेब, बँकेमधील पासबुक अद्ययावत ठेवणे, ३१ मार्चअखेर गुंतवणुकीवर प्राप्त होणाऱ्या व्याजाची माहिती, वेळीच मागणी करण्याची कार्यपद्धती, अंतिम महिन्यातील व्यवस्थापन याबाबत अॅड. पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले. ऑडिटचे नवे निकष व तयारी याची माहिती पतसंस्थांनी घ्यावी. लेखापरीक्षणाचे गुण प्राप्त करण्यासाठी अंतिम वेळी धावाधाव करू नये, असे करंबेळकर यांनी सांगितले. सूत्रसंचालन मोहन बापट तर आभार हेमंत रेडीज यांनी मानले.
नेटकेपणा, नवतंत्रज्ञानावर भर द्या
जिल्ह्यातला सहकार हा गर्दीचा नसला तरी सहकाराची विण येथे पक्की आहे. सहकारी संस्थांनी शासकीय धोरण, नवनवे बदल आत्मसात करून आपली कार्यपद्धती अधिक विकसित करावी. नेटकेपणा, नवतंत्रज्ञानावर भर द्यावा असे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:43 08-03-2025














