रत्नागिरी : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील प्रति विद्यार्थी प्रतिदिन आहार खर्चाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी ७४ पैसे, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी १ रुपया १२ पैसे वाढ १ मार्चपासून केली आहे.
पोषण आहारामध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार, तसेच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिदिन प्रतिविद्यार्थी १०० ग्रॅम आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो. सद्यःस्थितीत केंद्र शासनाने २७ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या आदेशान्वये प्रतिदिन प्रति विद्यार्थी आहार खर्चात दरवाढ मंजूर केली आहे.
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी ३ रुपये ८३ पैसे धान्य व अन्य माल पुरवण्यासाठी, तर इंधन आणि भाजीपाला यासाठी २ रुपये ३६ पैसे, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी ५ रुपये ७५ पैसे खर्च माल पुरवण्यासाठी, इंधन आणि भाजीपाला यासाठी ३ रुपये ५४ पैसे अशाप्रमाणे विभागणी करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 10/Mar/2025














