ठाणे : अरबी समुद्रात पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेल साठे सापडल्याने भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात आठ वर्षांच्या कालावधीनंतर १८ हजार चौरस किमी क्षेत्रफळाहून अधिक खनिज तेलाचे नवे साठे समोर आले आहेत. हे साठे पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील व सिंधुदुर्गातील मालवणजवळ समुद्रात आहेत. त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत.
केंद्रीय बंदरे व जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी अलीकडेच जेनपीच्या कार्यक्रमात भारत इंधन क्षमतेत स्वावंलबी होईल, असे सांगितले होते. त्याला या नव्या खनिज तेल साठ्याचा संदर्भहोता. अरबी समुद्रात ८ वर्षांपासून हे संशोधन सुरू होते. या नव्या साठ्याचे केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या उत्खनन करणार आहेत. मुंबईच्या समुद्रात जवळपास ७५ सागरी मैल अंतरावर १९७४ मध्ये बॉम्बे हाय येथे खनिज तेलाचा मोठा साठा सापडला होता. या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर खनिज तेल उत्खनन होत आहे. २०१७ मध्ये सापडलेल्या साठ्याच्या तुलनेत हे तेल साठे मोठे असल्याने तेल उत्पादन ४ पटीने वाढणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम खात्याने या नव्या तेलसाठ्याच्या संशोधन कार्याला गती दिली आहे.
राजापूर येथे होणारी रिफायनरी, डहाणू बंदर यामुळे कोकण प्रदेशात नवे उद्योग वाढीस लागणार असल्याने रोजगाराची निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार आहे. आकाराला येत असलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईचा विकासाला या तेल साठ्यामुळे गती मिळणार आहे.
डहाणूच्या समुद्रात ५,३३८.०३ आणि व तळ कोकणात सिंधुदुर्गजवळील समुद्रात १३ हजार १३१.७२ चौरस किमी क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत. आतापर्यंत आढळलेले २५ खनिज तेल साठे हे १ लाख ९१ हजार९८६ चौरस किमीवर आहेत. त्यात महाराष्ट्राशी निगडित १८ हजार ९६९.८५ चौरस किमी क्षेत्रफळाच्या साठ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राशी निगडित दोन्ही साठे उथळ समुद्रातील असून, त्यांचे अंतर किनार्यापासून ८६ सागरी मैलापर्यंत आहे. या नव्या तेलविहिरींच्या उत्खननामुळे कोकणातील उद्योगक्षेत्राला नवी झळाळी मिळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:39 PM 10/Mar/2025














