गेल्या पाच वर्षांत राज्यभरात २,२३७ बांगलादेशींना अटक

मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय ओळखपत्र प्राप्त करून राज्याच्या विविध भागांत वास्तव्य करणाऱ्या बांगला देशी घुसखोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. राज्यात अवैधरीत्या राहणाऱ्या बांगला देशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत तब्बल २२३७जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी ५२७ जणांना हद्दपार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात दिली आहे. विशेष म्हणजे बनावट कागदपत्रांच्या आधारे ओळखपत्रे तयार करणाऱ्या ७ भारतीय नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे स्तव्य करणाऱ्या बांगला देशी नागरिकांवर कारवाई करण्याबाबत ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. जानेवारी २०२५ मध्ये मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, सोलापूर व नाशिक जिल्ह्यांमध्ये बनावट कागदपत्रांआधारे भारतीय ओळखपत्र प्राप्त करून घेतल्याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथक व पोलिसांनी ३७ बांगला देशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर स्थानिक पोलिस ठाण्यांत १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई शहर व उपनगरात १८ जानेवारी ते २८ फेब्रुवारी, २०२५ या दरम्यान २५१ बांगला देशी नागरिकांना अटक केली आहे. १७ जणांना बांगला देशात हद्दपार करण्यात आले.

तसेच, एका महिला बांगला देशी नागरिकाचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे. दरम्यान, घर भाडेतत्त्वावर देताना, कामगार म्हणून नियुक्त करतांना भाडेकरूंची व कामगारांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

पुण्यात जमीन खरेदी
पोलिसांनी केलेल्या कारवाईत पुणे जिल्ह्यातील मौजे थेऊर (ता. हवेली) येथे बांगला देशी नागरिकांनी जमीन खरेदी केल्याचेही समोर आले आहे. हारुलाल पंचानन बिस्वास, रोहीत राजकुमार बिस्वास आणि सुकुमार पंचानन बिस्वास अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:07 PM 10/Mar/2025