रत्नागिरी : बुधवार, १२ मार्चपासून बोर्डाची सुरू होणारी बारावीच्या माहिती तंत्रज्ञान (आय टी) व सामान्यज्ञान (जी. के) विषयांची ऑनलाईन परीक्षाही गैरप्रकारमुक्त करण्यासाठी कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाने क्षेत्रीय अधिकारी आणि केंद्रसंचालकांना सक्त ताकीद दिली आहे. ऑनलाईन परीक्षा आयोजित केलेल्या सर्व संगणक प्रयोगशाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले असून लेखी परीक्षेप्रमाणेच प्रत्येक केंद्रासाठी बैठ्या व भरारी पथकांची नियुक्ती जिल्हास्तरावरून करण्याच्याही सूचना जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात या परीक्षेला २,९३८ विद्यार्थी बसणार आहेत.
बोर्डाची बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यात असून ११ मार्च रोजी लेखी परीक्षा (तुरळक विषय वगळता) संपत आहे. त्यानंतर १२ ते १८ मार्च या कालावधीत माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयाची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. कोकण विभागात या ऑनलाईन परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची निश्चिती झाली असून ज्या कनिष्ठ महाविद्यालयांना आयटी विषय मान्यता देण्यात आली आहे, त्याच कनिष्ठ महाविद्यालयात (काही अपवाद वगळता) परीक्षा केंद्र असणार आहे. तर प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या खाजगी सैनिकी शाळेत शिकवल्या जाणाऱ्या सामान्य ज्ञान या अनिवार्य विषयाची ऑनलाईन परीक्षाही ज्या त्या सैनिकी शाळेतच होणार आहे. कोकण विभागातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात प्रत्येकी एक खासगी सैनिकी शाळा आहे.
सर्व क्षेत्रीय अधिकारी, केंद्र संचालक, आयटी शिक्षक पर्यवेक्षक यांना विभागीय मंडळाने परीक्षेबाबत ऑनलाईन प्रशिक्षण दिले असून या सर्वांसह विद्यार्थ्यांसाठी माहिती पुस्तिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे.
इंग्रजी, जलसुरक्षा आणि पर्यावरण शिक्षण, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण हे तीन अनिवार्य विषय वगळता इतर विषयांकरिता वैकल्पिक विषय म्हणून कला, वाणिज्य व शास्त्र या तिन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान (आय टी) हा विषय घेता येतो. कोकण विभागीय मंडळातील ४,८०३ विद्यार्थ्यांनी हा वैकल्पिक विषय घेतलेला आहे. यामध्ये २,९३८ रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत. कोकण मंडळात ७० परीक्षा केंद्रांवर या विषयाची ऑनलाईन परीक्षा होणार आहे.
असे आहे वेळापत्रक – माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा १२,१५ व १७ मार्च रोजी सकाळी ११ ते १:३० आणि दुपारी ३:०० ते ५:३० या वेळेत बॅचनुसार होणार आहे. तर सामान्य ज्ञान विषयाची परीक्षा १५,१७ व १८ मार्च रोजी सकाळी ११ ते १ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत बंच नुसार होणार आहे. लेखी परीक्षेप्रमाणे याही परीक्षेत दहा मिनिटांचा जादा वेळ देण्यात आला दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रति तास २० मिनिटे जादा वेळ देण्यात येणार आहे. विहित वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर परीक्षेच्या संगणक प्रयोगशाळेत अर्धा तास अगोदर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
गैरप्रकार करणाऱ्यांना इशारा…
माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान या विषयांची ऑनलाईन परीक्षा घेत असताना शासनाच्या कॉपीमुक्त परीक्षा धोरणाचा अवलंब काटेकोरपणे इतर विषयाच्या परीक्षेप्रमाणेच करावयाचा आहे. परीक्षा काळात सदर धोरणाचा अवलंब न केल्यास व विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत केल्यास संबंधित कनिष्ठ महाविद्यालयावर तसेच परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, तांत्रिक सहाय्यक व शिपाई या सर्वांवर महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२, महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवा व शर्ती) नियमावली १९८१ नुसार व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
असे आहे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
माहिती तंत्रज्ञान विषयाची परीक्षा अडीच तासांची व ८० गुणांची असून त्यात रिकाम्या जागा, चूक की बरोबर, बहुपर्यायी एक उत्तर बरोबर, दोन उत्तरे बरोबर, तीन उत्तरे बरोबर, जोड्या लावा, लघुत्तरी प्रश्र आणि एचटीएमएल कोड व प्रोग्रॅम लिहिणे असे प्रश्न असतील. २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा यापूर्वीच कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर झालेली आहे. तर सैनिकी शाळांमधील सामान्य ज्ञान विषयाची परीक्षा २ तासांची १०० गुणांची आहे. या परीक्षेत शंभर प्रश्न असतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 11/Mar/2025














