Ratnagiri : स्मार्ट सिटीच्या १८० कोटींच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी शहराचा कायापालट करण्याचा पालकमंत्री उदय सामंत यांनी चंग बांधला आहे. नुकतीच त्यांनी ४०० कोटी रुपये खर्चाची ‘स्मार्ट सिटी’ संकल्पना मांडली. यातील सुमारे १८० कोटी रुपये खर्चाच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. यापूर्वी रत्नागिरी शहरात इतरही अनेक महत्त्वाची विकासकामे पूर्ण झाली आहेत.

उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहर व परिसर पथदर्शी प्रकल्पांतर्गत स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी उद्योग मंत्रालयाने ४०० कोटी रुपये मंजूर केले असल्याचे सांगितले. या स्मार्ट सिटीसाठी रस्ते, तलाव, बस, रिक्षा थांबे, सोलर प्लॅट, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंतर्गत रस्ते, पानवल धरण दुरूस्ती अशी अनेक पायाभूत सुविधांची कामे अशी इतर अनेक कामे केली जाणार आहेत. यातील १८० कोटी रुपयांच्या कामाची निविदाही काढण्यात आली आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ही कामे केली जाणार आहेत. स्मार्ट सिटीच्या ४०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात रत्नागिरी नगर परिषदेचा १० टक्के म्हणजेच ४० कोटी रुपये हिस्सा असणार आहे. रत्नागिरी शहरात यापूर्वी मुख्य रस्त्यांचे कॉक्रीटीकरण, शिवसृष्टी, तारांगण, मांडवी येथील जलतरण तलाव, चवंडेवठार येथील गार्डन, सावरकर नाट्यगृह नुतनीकरण, छत्रपती शिवाजी स्टेडियम नूतनीकरण, अशी अनेककामे पूर्ण झाली आहेत. काही कामे प्रगतीपथावर आहेत. त्यात आता पायाभूत सुविधांच्या कामांची लवकरच सुरूवात होणार आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधकांना पाच वर्षानंतरच्या निवडणूकीत बोट ठेवण्यास किंवा आरोप करण्यास काही राहील की नाही, याबाबत शंका आहे.

सोमवारी भूमिपूजन सोहळ्याची तयारी
स्मार्ट सिटी प्रकल्पातील पायाभूत सुविधांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा सोमवारी होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजन सुरू केले आहे. स्वा. सावरकर नाट्यगृहात हा सोहळा होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 05/Oct/2024