रत्नागिरी : लोकमान्य टिळक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्या लोकार्पण

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने साधना फाऊंडेशनच्या माध्यमातून रत्नागिरीतील गोरगरीब जनतेसाठी नगर पालिकेच्या माध्यमातून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल रविवारी नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज अशा या रुग्णालयात कॅन्सरसारख्या असाध्य रोगापासून विविध प्रकारच्या सर्जरी व सेवा मोफत दिल्या जाणार आहेत.

शहरातील मजगाव रोड येथील कोव्हिड रुग्णालयाचा कायापालट करून सुमारे साडेसात कोटी खर्च करुन हे अद्ययावत रुग्णालय उभे केले आहे. अत्याधुनिक आयसीयू, सुसज्ज लामिनार फ्लो व एसईपीए फील्टर सिस्टिमसह दोन ऑपरेशन थियटर या ठिकाणी आहेत. कॅन्सरसह किमोथेरपी, न्यूरोसर्जरी, हाडांचे वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन, लिगामेंट रिपेयरचे ऑपरेशन, युरोलॉजीमध्ये किडनी व ब्लैंडर ट्रिटमेंट प्रोसिजर, नेम्रॉलॉजी ऑपरेशन, डायलिसीस युनिट, ए.व्ही. फिस्टू, जनरल सर्जरी, नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग, डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी यासारख्या व्यवस्था मोफत देण्यात येणार आहेत.

ठाणे येथील साधना फाऊंडेशनच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जाणार आहे. मुंबईतील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यासाठी रत्नागिरीत येणार आहेत. आधार कार्ड व रेशन कार्ड यासाठी आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला औषधोपचार, सर्जरीसह पौष्टिक जेवणही मोफत दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे अत्यंत माफक दरामध्ये ओपीडी पेशंटची तपासणी केली जाणार आहे.

ना नफा ना तोटा तत्त्वावर हे रुग्णालय साधना फाऊंडेशनला चालवण्यास देण्यात आले आहे. यासाठी नऊ वर्षांचा करार करण्यात आला आहे. रुग्णालयात अॅडमीट रुग्णावर मोफत उपचार केले जाणार आहेत. या इमारतीसाठी व अत्याधुनिक यंत्रणेसाठी साडेसात कोर्टीचा खर्च आला आहे. – तुषार बाबर मुख्याधिकारी, रत्नागिरी नगर परिषद.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 05/Oct/2024