रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत (ध्वनीक्षेपक) माहिती घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे; तसेच आवाजावरही मर्यादा ठेवण्याबाबत ताकीद दिली आहे. कायद्यानुसार त्या दिवसासाठी ध्वनीक्षेपकाची परवानगी दिली जाते. कायमस्वरूपी लावण्याची परवानगी दिली जात नाही असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत परवानगी बंधनकारक केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयालाही त्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर जिल्ह्यात कार्यवाही सुरू झाली. विधानसभेमध्ये आमदार देवयानी फरांदे आणि अतुल भातखळकर यांनी विविध प्रार्थनास्थळावरील भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाची लक्षवेधी केली होती.
याला उत्तर देतना मुख्यमंत्र्यांनी विविध प्रार्थनास्थळावरील भोंग्यांना परवानगी आहे का, आवाजाच्या मर्यादा पाळल्या जातात आदींबाबत माहिती घेण्याच्या आदेश दिले आहेत. भोंग्याच्या आवाजाच्या मयदिचे उल्लंघन झाल्यास संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाणार आहे. तशा सूचना जिल्हा पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अधिकारी खडबडून झाले झाले असून, कारवाई टाळण्यासाठी या सूचनेचे काटेकोर पालन करण्याबाबत तत्काळ पावले उचलली आहेत.
जिल्ह्यातील विविध प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांच्या माहिती अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. सणासुदीला किंवा कार्यक्रमाला त्या त्या दिवसांसाठी ध्वनीक्षेपक लावण्याची परवानगी दिली जाते. कायद्याने ध्वनीक्षेपकासाठी कायमस्वरूपी परवानगी दिली जात नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कायद्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ध्वनीक्षेपकांचा आवाज किती डेसीबल आहे हे मापले जाते. त्यात उल्लंघन झाले तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांमार्फत कारवाई केली जाणार आहे.
मनसेने यापूर्वी दिला होता इशारा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. या भोंग्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. पोलिस यंत्रणेने जर कारवाई केली नाही तर मनसे स्टाईलने आपण हे भोंगे बंद पाडू, असा इशारा दिला होता. तेव्हा काही दिवस भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण आले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 13/Mar/2025
