चिपळूण : Shimgotsav | होळीसाठी शहरातील बाजारपेठा विविध प्रकारच्या पिचकाऱ्या आणि रंगांनी सजल्या आहेत. नैसर्गिक रंगांना यंदा मागणी वाढली आहे. शहरातील बाजारपेठांत इलेक्ट्रिक वॉटरगन तसेच कार्टूनचे छायाचित्र असलेल्या पिचकारीची क्रेझ वाढली आहे. यावर्षी नैसर्गिक रंगांना विशेष मागणी असल्याचे दिसून येत आहे.
कोकणात शिमगोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. पुणे, मुंबईत नोकरी करणारे चाकरमानी होळी सणासाठी आवर्जून गावाकडे येतात. होळीसाठी विविध रंग आणि पिचकाऱ्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. रासायनिक रंगांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांमुळे नागरिक नैसर्गिक रंगांना प्राधान्य देत आहेत.
त्यामुळे बाजारात नैसर्गिक रंगांची मागणी वाढली आहे. सध्या बाजारात १०० ते ५०० रुपयांपर्यंत विविध प्रकारचे रंग विक्रीस उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ५० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंत विविध आकारांतील आणि रंगांतील पिचकाऱ्या उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी कार्टूनचे छायाचित्र असलेले विविध आकारांतील पिचकाऱ्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये डोरेमॉन, स्पायडर मॅन, मिकी माऊस, डोरे मॅन, डक, छोटा भीम आहे तसेच बटनवाली पिचकारीदेखील उपलब्ध आहे. त्यामध्ये घोडा, बटरफ्लाय, बंदूक, बेडूक असे विविध प्रकार आहेत. या पिचकाऱ्या ५०० ते १२०० रुपयांपर्यंत मिळत आहेत. तरुणाईसाठी मोठ्या प्रेशरच्या पिचकाऱ्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत तसेच होळीनिमित्त विशेष टी-शर्टदेखील बाजारात पाहायला मिळत आहेत.
यंदा होळी पगाराच्या वेळेत आल्याने खरेदीमध्ये वाढ होत आहे तसेच पर्यावरणपूरक असे रंग यंदा बाजारात दाखल झाले आहेत. पर्यावरणपूरक रंगांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे-संजय धामणसकर, व्यापारी, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:44 PM 13/Mar/2025
