कोल्हापूर : महाराष्ट्रीयन जेवणाची खासियत कशात असेल तर ती वेगवेगळ्या मसाल्यांच्या पदार्थामध्ये या मसाल्याच्या पदार्थामुळे तर इथल्या जेवणाची लज्जत पार सातासमुद्रापार पोहोचलेली आहे, मात्र, अलीकडच्या काही वर्षांत या मराठमोळ्या जेवणाच्या फोडणीला भेसळीचा ‘ठसका’ लागताना दिसत आहे.
मसाल्यातील भेसळ
तमालपत्र, बडीशेप, चक्रफूल, मिरे, ओवा, काळाजीरा, दालचिनी, धणे, जिरे, कडीपत्ता, लवंग, वेलदोडा, मेथी, मोहरी, तीळ, चिंच, आमसूल, केशर, खसखस, हळद हे मसाल्याचे पदार्थ म्हणजे जेवणाचे सार आहे. मात्र, अलीकडील काही वर्षांत या मसाल्याच्या पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आढळून येऊ लागली आहे. तमालपत्र म्हणून कोणत्या तरी जंगली झाडाची पाने गळ्यात मारली जात आहेत. चक्रफुलाच्या नावाखाली भलतेच काही तरी ग्राहकांच्या माथी मारून त्याला उल्लू बनविण्याचा उद्योग चालतो. तेल आणि अर्क काढून घेतलेल्या लवंगा, वेलदोडे आणि मिरे ग्राहकांच्या डोक्यावर वाटण्याचा उद्योग खुलेआमपणे सुरू आहे. भेसळीचा ओवा ग्राहकांची पोटदुखी वाढवायला कारणीभूत ठरू लागला आहे. काळाजीरा म्हणून कसल्याही झाडाच्या बिया गळ्यात मारल्या जात आहेत. दालचिनी म्हणून भलत्याच झाडाची साल ग्राहकाला चिकटवली जात आहे. थना किवा धना पावडरीतील लाकडाच्या भुशाची भेसळ तर ‘धन्य धन्य’ म्हणावी अशा स्वरूपाची आहे.
चक्क धोतऱ्याचा वापर
धोतरा ही एक विषारी वनस्पती आहे. आपल्या आजूबाजूला रानावनात काटेरी बोंडे असलेली ही वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळून येते. या धोत याच्या बोंडाच्या आतमध्ये ज्या काळ्या बिया असतात, त्या दिसायला हुबेहूब मोहरीसारख्या दिसतात; पण विषारी असतात. या बिया खाण्यात आल्या तर माणसाचीच काय, जनावराचीसुद्धा बुध्दी भ्रष्ट होण्याचा धोका असतो. मात्र,
भेसळीच्या धंद्यातील बक्कळ पैशामुळे मती भ्रष्ट झालेली मंडळी या धोतऱ्याच्या बिया मोहरीत मिसळताना दिसतात. आता याचा काय परिणाम होत असेल, ते सांगायलाच पाहिजे असे नाही.
उदंड झाली भेसळ !
तिळामध्ये कुडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीच्या शिजवलेल्या बिया मिसळल्या जात आहेत. केशर म्हणून मक्याच्या कणसावर तरंगणारे तुरे ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. खसखसमध्ये गव्हाचा रवा आणि हळदीत चक्क खडूची पावडर किंवा पिवळ्या रंगाचा वापर केला जात आहे. मसाल्याच्या पदार्थांमधील या असल्या भेसळीमुळे अस्सल मराठमोळ्या जेवणाची लज्जत हळूहळू बेचव होताना दिसत आहे. आजही अगदी सातासमुद्रापार मराठमोळ्या मसालेदार जेवणाची एक वेगळी खासियत आहे. जगभरात मराठमोळ्या जेवणाची ही चव नावाजलेली आहे. मात्र, आजकाल मसाल्याच्या पदार्थात होत असलेल्या भेसळीमुळे मराठमोळ्या जेवणाचाही दुलौकिक होताना दिसत आहे. हे टाळून महाराष्ट्रीयन जेवणाची खासियत टिकवून ठेवायची असेल तर मसाल्याच्या पदार्थातील भेसळीविरुद्ध कटारे कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
अंगावर शहरा आणणारी मसाल्यातील भेसळ..!
पूर्वी अस्सल मसाल्याचे पदार्थ वापरून घरच्या घरीच दगडी पाट्यावर वाटून वेगवेगळे मसाले तयार केले जायचे; पण आजकाल सगळाच जमाना इन्स्टंट आणि फास्टफूडचा झाला आहे. त्यामुळे जेवणातील मसालेसुद्धा तयार मिळतात; पण काही नामांकित आणि परंपरागत मसाला विक्रेत्यांचा अपवाद वगळला, तर पाच-दहा रुपयांत आणि गल्लीबोळात मिळणाऱ्या या तयार मसाल्यांचे वास्तव अंगावर काटा आणणारे आहे. लाकडी भुस्सा, कागदी पुढे आणि अनेक प्रकारचा कचरा घालून असे मसाले तयार होताना दिसतात. शिवाय, ही भेसळ आळखू नये म्हणून त्यात वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांचा वापर होताना दिसतो. आता हा असला नमुनेदार मसाला खाल्ल्यावर जनतेच्या आतडांना कोणकोणत्या रोगांची फोडणी मिळत असेल, त्याचा सर्वसामान्यांना आणि खवय्यांना अंदाज येण्यास हरकत नाही.
मसाल्यातील भेसळ ओळखण्याचे काही उपाय
धना पावडर खरी असेल तर पाण्यावर तरंगते आणि लाकडाचा भुसा बुडतो. जिरे हातावर चोळताच काळे पडले तर शंभर टक्के बोगस. अर्क आणि तेल काढलेल्या मिरीला रॉकेलसारखा वास येतो आणि ती प्रमाणापेक्षा जास्त चमकते. भेसळीच्या हळद पावडरीत पाच थेंब हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि पाच थेंब पाणी टाकले की, त्याला वांग्यासारखा वास येतो. अशी हळद खाणे म्हणजे कर्करोगाला हमखास निमंत्रण. दालचिनी हातावर रगडल्यावर त्याचा रंग आणि वास तुमच्या हाताला लागला तरच ती अस्सल. भेसळयुक्त तीळ पाण्यात टाकले की, त्यात मिसळलेल्या कुडूंच्या बिया एक-दोन मिनिटांत फुगून टम्म होऊन तळाशी जाऊन बसतात. केवळ नुसत्या वासावरूनही अनेकदा असली आणि नकली मसाले ओळखता येतात; पण त्यासाठी नागरिकांनीही काही बाबतीत सतर्क असण्याची आवश्यकता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 14/Mar/2025














