उबाठा शिवसेनेची आज रत्नागिरीत बैठक

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील निष्ठावंतांना उमेदवारी द्यायची की, अन्य पक्षातून आयात करणाऱ्याला संधी द्यायची, याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शनिवारी (ता. ५) महत्त्वाची बैठक रत्नागिरीत होणार आहे. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत याबाबत पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकणार आहेत; परंतु अनेक पदाधिकारी निष्ठावंतांना संधी देण्यावर ठाम असल्याने ठाकरे गटातून उमेदवारीची संधी शोधणाऱ्यांचा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात सलग चार टर्म निवडून येणारे उद्योगमंत्री उदय सामंत यांना टक्कर देण्यासाठी कोणता उमेदवार द्यावा याबाबत ठाकरे गटामध्ये चाचपणी सुरू आहे. उबाठामध्ये सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने या दोघांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी उदय बने यांच्याबाबत अनेकांचे एकमत आहे. मातोश्रीवरून आलेला आदेश त्यांना शिरसावंद्य आहे.

महायुती असल्यामुळे ही जागा शिवसेनेच्याच पदरात पडणार आहे; परंतु गेली दोन ते तीन वर्षे भाजपकडून उमेदवारी मिळेल, ही अपेक्षा धरून काम करणारे भाजपचे माजी आमदार बाळ माने उमेदवारीसाठी उबाठात जाण्याची चर्चा सुरू होती. ते मातोश्रीवर गेल्याचेही बोलले जाते; परंतु त्याला अजून दुजोरा मिळालेला नाही. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. ५) उबाठाची महत्त्वाची बैठक होणार आहे. विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी द्यायची की, बाहेरून येणाऱ्याला द्यायची यावर चर्चा होणार आहे. बाहेरून आलेल्याला उमेदवारी दिली तर सर्व पदाधिकारी काम करतील का याचीही चाचपणी केली जाणार आहे; परंतु २०१४चा अनुभव गाठीशी असल्याने अनेक शिवसैनिक आपल्याच पक्षातील निष्ठावंताला उमेदवारी देण्यावर ठाम आहे. तसे झाले तर अन्य पक्षातून येणाऱ्यांची दारे बंद होण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 05/Oct/2024